उस्मानाबाद : शहरातील नवीन उत्तर पोलीस ठाणे सुरू करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे़ कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत मागविलेल्या अर्जामध्ये काही जणांना उत्तर पोलीस ठाण्यात नेमणूक देण्यात येत आहे़ लवकरच इमारतही निश्चित करण्यात येणार असल्याचे समजते़ उत्तर पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, तपासाच्या प्रक्रियेलाही गती येणार आहे़मागील जवळपास तीन-चार वर्षापासून उत्तर पोलीस ठाणे निर्मितीचा प्रश्न विविध कारणांवरून रखडला होता़ परिणामी शहर पोलीस ठाण्यातील अपुरे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा मोठा ताण पडला होता़ आंदोलने, मोर्चा, निवडणुका, जयंती असो अथवा इतर कोणाताही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम असो तेथे नेमण्यात येणारा बंदोबस्त, रजेवर जाणारे कर्मचारी, मुख्यालयाशी संलग्न कर्मचारी पाहता ठाण्यात केवळ आठ ते दहा कर्मचारी शिल्लक राहत होते़ परिणामी चोरट्यांनी शहरासह परिसरात एकच धुमाकूळ घातला होता़ हाणामाऱ्यांसह इतर अनेक प्रकारचे गुन्हेही उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश येत होते़ तसेच तपासाची गतीही मंदावली होती़ त्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी पोलीस प्रमुखपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली होती़ त्यामुळे काहीप्रमाणात कामकाजात सुधारणा झाली आहे़ त्यातच आता त्रिमुखे यांनी उत्तर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यासाठी जोरदार हलचाली सुरू केल्या आहेत़ जिजाऊ चौक ते सांजा रोड या मार्गावर शहराचे विभाजन उत्तर व दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आले आहे़ उत्तर पोलीस ठाण्यासाठी इमारतीची पाहणी सुरू आहे़ उत्तर पोलीस ठाण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जवळपास १०५ पदे मंजूर आहेत़ या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनीही सुरू असलेल्या बदली प्रक्रियेत काही कर्मचाऱ्यांची उत्तर पोलीस ठाण्यात नेमणूक केल्याचे वृत्त आहे़ उस्मानाबाद विभागातील कर्मचाऱ्यांच्या रविवारी मुलाखती झाल्या आहेत़ इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर उत्तर ठाण्यात नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अधिकृत आॅर्डर पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ (प्रतिनिधी)
नवीन ठाण्याला लवकरच मुहूर्त
By admin | Updated: April 20, 2015 00:31 IST