रोज होताहेत ३ ते ४ शस्त्रक्रिया
घाटी रुग्णालय : दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, म्युकरमायकोसिस कृती समिती नियुक्त
औरंगाबाद : घाटीत दाखल म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत असून, दररोज ३ ते ४ शस्त्रक्रिया होत आहेत. रुग्णांच्या प्रकृतीत जलदगतीने सुधारणा होण्याच्यादृष्टीने ओपन शस्त्रक्रियेऐवजी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आतापर्यंत ३० रुग्णांच्या शस्त्रक्रिया घाटीत झाल्या आहेत.
घाटी रुग्णालयात कान-नाक-घसा विभागाचे प्राध्यापक डाॅ. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली म्युकरमायकोसिस कृती समिती नेमण्यात आली आहे. या समितीत नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ. शुभा घोणसीकर, डाॅ. दर्पण जक्कल, डाॅ. अविनाश हुंबे, डाॅ. अर्चना वरे यांचा समावेश आहे. घाटीत दाखल रुग्णांचा आढावा घेऊन उपचाराचे नियोजन करण्याची जबाबदारी ही समिती पार पाडत आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वॉर्ड क्रमांक १५, १६ आणि २० मध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल आहेत. घाटीत आजघडीला ७५ रुग्ण भरती आहेत. म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया शस्त्रक्रियागार क्रमांक-१ मध्ये होत आहेत. रोज ३ ते ४ शस्त्रक्रिया होत आहेत. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा अधिक चांगली होण्यासाठी नाकातून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून फंगस काढून टाकला जातो. नेत्ररोगतज्ज्ञ डोळ्यांची तपासणी करून निर्णय घेतात, असे डाॅ. सुनील देशमुख यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेसाठी डाॅ. सुनील देशमुख यांच्यासह डाॅ. वसंत पवार, डाॅ. शैलेश निकम, डाॅ. महेंद्र कटरे, डाॅ. सोनाली जटाळे, डाॅ. शुभा घोणसीकर आणि त्यांचे पथक परिश्रम घेत आहे.
३०० इंजेक्शन्स मिळाली
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेली ३०० इंजेक्शन्स घाटी रुग्णालयाला गुरुवारी मिळाली आहेत. या रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्डही करण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी दिली.