गजेंद्र देशमुख जालनाजिल्ह्यातील रेशीम कोषाला चांगला भाव मिळावा, रेशीम क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने वर्षभरापूर्वी मान्यता मिळालेल्या रेशीम मार्केटचे काम जून महिन्यात सुरू होत असून, मार्केट पूर्ण झाल्यास रेशीमच्या क्षेत्रात चौपट वाढ होईल असा विश्वास रेशीम विभागाचे प्रादेशिक सहसंचालक दिलीप हाके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्यात गत काही वर्षांत शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच नगदी अशा रेशीम शेतीवर भर दिला आहे. मराठवाड्यात चार हजार हेक्टरवर तुती लागवड होती. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे सुमारे एक हजार एकर लागवड क्षेत्र जालना जिल्ह्यात आहे. त्यामुळे राज्य शासनाने वर्षभरापूर्वी रेशीम मार्केटला मान्यता दिली होती. त्यानुषंगाने रेशीम सहसंचालक हाके यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. हाके म्हणाले, शहरापासून जवळच असलेल्या सिरसवाडी शिवारात सुमारे एक हेक्टर जागेवर हे मार्केट साकारणार आहे. मार्केटचा पायाभूत विकास आराखडा रेशीम विभाग व एका खाजगी एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला आहे. हे काम जून महिन्यात सुरू होणार आहे. कर्नाटकातील रामनगर येथील विविध रेशीम मार्केटचा अभ्यास करून अत्याधुनिक असे मार्केट जालन्याचे असणार आहे. यासाठी ५ कोटी ८८ लाखांचा निधीला मान्यता मिळाली आहे.
बहुप्रतीक्षित रेशीम मार्केटचे काम जूनमध्ये सुरू होणार
By admin | Updated: April 6, 2017 23:40 IST