सेलू : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर राहत असून, मनरेगा योजनेच्या सिंचन विहिरीच्या प्रस्तावांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप रवळगाव ग्रामस्थांनी केला. याबद्दल १५ डिसेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात रवळगाव ग्रामस्थांनी आंदोलन केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी. एल. मोडक हे कार्यालयात सतत गैरहजर राहतात, अशी तक्रार रवळगाव ग्रामस्थांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत रवळगाव ग्रामस्थांनी मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहीर घेण्यासाठी पं. स. कार्यालयात प्रस्ताव सादर केले. परंतु, मोडक यांनी कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडवणूक केली. मनरेगा योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयात नेहमीच खेटे मारावे लागतात. काही कामानिमित्त मंगळवारी रवळगावचे ग्रामस्थ पं.स. कार्यालयात मोडक यांची वाट पाहत थांबले होते. परंतु, मोडक कार्यालयात हजर नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या कक्षात आंदोलन केले. त्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी महिवाल यांच्याकडे ग्रामस्थांनी दिले आहे. सदरील निवेदनावर महादेव भाबट, सुरेश बोराडे, राजेश काळे, हरिभाऊ रोडगे, विलास रोडगे, सर्जेराव सपाटे, आकाश तौर, रामकिशन रोडगे, शिवाजी रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच पं. स. चे उपसभापती संतोष डख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)
बीडीओंच्या दालनात आंदोलन
By admin | Updated: December 16, 2015 23:31 IST