ल्ाातूर : जीर्ण इमारतीने गंजगोलाई परिसरात दोघा मायलेकराचा बळी घेतला असून, या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन बोध घेत नाही़ शहरात अनेक इमारती धोकादायक असताना केवळ नोटिसा पाठवून कर्तव्य बजावल्याचा कागदोपत्रांचा सोपस्कार केला जात आहे़ मनपाच्या म्हणण्यानुसार लातूर शहरात केवळ ११३ इमारती धोकादायक आहेत़ प्रत्यक्षात मात्र पाच हजारपेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत़ मनपाच्या नोंदीनुसार ५८ इमारती गाव भागातील म्हणजे ‘डी’ झोनमधील आहेत़ तर २७ इमारती ‘सी’ झोनमधील आहेत़ ‘ए’ झोनमध्ये १५ तर ‘बी’ झोनमध्ये १३ इमारती धोकादायक आहेत़ या सर्व इमारतींच्या मालकांना इमारत पाडण्यासंदर्भात मनपाने सूचित केले करून सोपस्कार पार पाडला आहे़ लातूर शहरात अनेक इमारतींचे बांधकाम नगर रचनेच्या नियमानुसार नाही़ शहरात मनपाचे चार झोन असले तरी झोन अधिकाऱ्यांचे या विस्तारीकरणावर लक्ष नाही़ त्यामुळे बांधकामाचा आकार-उकार नियमानुसार होत नाही़ शिवाय, काही बांधकामांना तर परवानेही नाहीत़ त्यामुळे धोकादायक इमारतींचे प्रमाण शहरात वाढत आहे़ गाव भागातील वर्दळीच्या ठिकाणी ‘डी’झोनमध्ये ५८ इमारती धोकादायक आहेत़ एक वर्षापुर्वी मनपाने धोकादायक इमारती मालकांना इमारत पाडण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या़ त्यानंतर इमारत पाडली की नाही, हे पाहण्याचे साधा सोपस्कार मनपाने केला नाही़ त्यामुळे अनेक वर्षांपासून धोकादायक इमारती उभ्या आहेत़ ‘सी’ झोन मध्येही २७ इमारती धोकादायक आहेत़ मनपाच्या सर्व्हेक्षणानुसारच या धोकादायक इमारतींचा आकडा आहे़ नोटीस पाठविण्यापुरतेच मनपाने काम केले आहे़ नोटीस दिल्यानंतर संबंधित मालकांना जावून मनपाचा कोणताही कर्मचारी भेटलेला नाही़ त्यामुळे या इमारती तशाच उभ्याच आहेत़‘ए’ झोनमध्ये १५ तर ‘बी’झोनमध्ये १३ इमारती धोकादायक स्थितीत आहेत़ या झोनमधील अधिकाऱ्यांनीही फक्त नोटिसाच पाठविल्या आहेत़ त्यामुळे संबंधित मालकांनी इमारती पाडण्याचे सौजन्य दाखविले नाही़ जवळपास ११३ इमारती धोकादायक स्थितीत असताना त्याची पाहणी नोटिसीनंतर मनपाने केली नाही़ दरम्यान, बुधवारी सायंकाळी गंजगोलाई परिसरात जुनी जीर्ण इमारत अंगावर पडल्याने एका महिलेचा व तिच्या मुलाचा मृत्यू झाला़ त्यानंतरही मनपाने बोध घेतलेला दिसत नाही़ पहिला केलेल्या सर्व्हे पुन्हा रिवाईज केला जाणार आहे़ त्यानंतर इमारत पाढण्यासंदर्भात संबंधितांना कळविले आहे़ (प्रतिनिधी)
पाच हजारांपेक्षा अधिक इमारती धोकादायक
By admin | Updated: November 18, 2016 00:50 IST