औरंगाबाद : घरगुती कार्यक्रमानिमित्त पुंडलिकनगर भागातून संजयनगरकडे जाणाऱ्या एका महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन तोळ्यांचे गंठण आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र, असा ६० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीची रवानगी न्यायालयाने हर्सूल कारागृहात केली आहे.शेख उस्मान शेख महंमद (रा. रोशनगेट), असे आरोपीचे नाव असल्याचे फौजदार कल्याण शेळके यांनी सांगितले. २९ मार्च २०१५ रोजी सोनाली प्रवीण दाभाडे (रा. पुंडलिकनगर, गल्ली नं. ७) ही एका घरगुती कार्यक्रमानिमित्त संजयनगरकडे जात होती. रिक्षातून जाताना प्रवासी असलेल्या काही महिला जयभवानीनगर चौकात उतरल्यावर सोनाली दाभाडे ही एकटीच रिक्षात होती. सोबत तिचा तीन वर्षांचा मुलगा होता. ही संधी साधून रिक्षाचालक आरोपी शेख उस्मान याने रिक्षा अंधारात नेऊन थांबविली व सोनालीला चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने काढून देण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीला भीक न घातल्यामुळे आरोपीने सोनालीच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला. मुलाच्या जिवाला धोका निर्माण झाल्यावर सोनालीने जवळील सर्व दागिने दिले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपीला तपास अधिकारी कल्याण शेळके यांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन तोळ्यांचे गंठण आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र, असा ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्याकडून ऐवज जप्त
By admin | Updated: December 27, 2015 00:25 IST