नवी दिल्ली : दिल्लीत १ एप्रिल २०२० पूर्वी विकल्या गेलेल्या बीएस४ वाहनांच्या नोंदणीस परवानगी देण्याच्या मागणीसाठी वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले असून, त्यावर अंतिम निवाडा देण्याचे मान्य केले आहे. ‘फाडा’नेच ही माहिती दिली आहे.
‘फाडा’चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी एका ट्वीटद्वारे सांगितले की, ‘बीएस४ प्रकरणात आज आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील दिवस चांगला राहिला. आमचे अपील स्वीकारण्यात आले आहे. अधिक तपशिलासाठी अंतिम आदेश अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट उद्या अवश्य पाहा.’
मार्च २०२० मध्ये ‘फाडा’च्या एका अर्जावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली वगळून उर्वरित देशात बीएस४ वाहनांच्या विक्री व नोंदणीस १० दिवसांची अंशत: मुदतवाढ दिली होती. कंपन्यांनी विहित मर्यादेपेक्षा जास्त वाहने विकल्यामुळे आपला आदेश न्यायालयाने नंतर मागे घेतला होता. तसेच वाढीव १० दिवसांत विकण्यात आलेली अतिरिक्त वाहने नोंदली जाणार नसल्याचेही न्यायालयाने म्हटले होते.
दिल्लीत मुदतीनंतर विकण्यात आलेल्या वाहनांची नोंदणी होणार नसल्याचे या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.
यानंतर न्यायालयाने ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्येही काही आदेश या प्रकरणात दिले. यावर ‘फाडा’ने आपले अपील दाखल केले आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे, अशी माहिती ‘फाडा’ने दिली आहे.
सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात वाहन विक्री पूर्णत: ठप्प झाल्यामुळे बीएस४ वाहनांच्या विक्रीस मुदतवाढ देण्याची ‘फाडा’ची मूळ मागणी होती.
..................