लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खेळाडूंच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा विभागाच्या वसतिगृह इमारतीमध्ये सध्या वेगळेच खेळ सुरू आहेत. इमारतीच्या हॉलसह अनेक खोल्यांमधील अस्वच्छता याची साक्ष देत आहेत. इमारतीच्या दरवाजे, खिडक्या गायब झाल्या असून, मुख्य प्रवेशद्वारात गवत व पिंपळाची झाडे उगवली आहेत.क्रीडा विभगााच्या वतीने घेण्यात येणाºया क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा, शिबिरे यासाठी येणारे खेळाडू व क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हा क्रीडा संकुलाच्या इमारतीला लागून चार वर्षांपूर्वी क्रीडा विभागाने वसतिगृहाची उभारणी केली. क्रीडा विभागाच्या वसतिगृहाची ही दोन मजली इमारत बांधकामापासूनच चर्चेत आहे. बांधकाम पूर्ण झाले तरीही या इमारतीचे क्रीडा विभागाकडे रीतसर हस्तांतरण झालेले नाही. असे असतानाही या इमारतीचा वापर सुरू करण्यात आला.मात्र, क्रीडा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे इमारतीची ही नूतन वास्तू भकास बनली आहे. मुख्य दरवाजाच्या दर्शनी भागाचे दोन्ही बाजूचे काच तोडण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजास कुलूप असले तरी बाजूने कोणीही आत येऊ शकतो. दोन्ही मजल्यावरील खोल्यांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत. वसतिगृहाच्या इमारतीमध्ये काही जण चोरून-लपून नको ते उद्योग करीत असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.फरशीवर पडलेली पाकिटे त्याची साक्ष देत आहेत. इमारतीच्या सर्वच खिडक्यांचे काच तुटले आहेत. त्यामुळे बाहेरील वेलींना आत प्रवेश करायला सुरुवात केली आहे.विद्युत फिटिंग योग्य पद्धतीने न झाल्यामुळे सर्वत्र वायर लोंबकळत आहे. काही खोल्यांमधील विद्युत बोर्ड चोरून नेण्यात आले आहेत. मुख्य हॉलसह अनेक खोल्यांमधील छताचा स्लॅब कोसळला आहे. इमारतीच्या परिसरात सर्वत्र गाजर गवत उगवले आहे.वसतिगृहाच्या या इमारतीमध्ये दिवसा रातकिडे किर्रर्र करीत असल्याने ही इमारत एखाद्या भूतबंगल्यासारखी भासत आहे. खेळाडूंच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाची, अशी दुरवस्था झाल्यामुळे क्रीडाप्रेमी नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
क्रीडा विभागाच्या वसतिगृहात चालतात वेगळेच ‘खेळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:57 IST