औरंगाबाद : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सध्या वेगवेगळ्या पक्षांचे १६ सदस्य आहेत. ३० एप्रिलपूर्वी ड्रॉ पद्धतीने ८ सदस्यांना निवृत्त व्हावे लागणार आहे. स्थायीमध्ये एमआयएमचे एकूण चार नगरसेवक आहेत. ड्रॉ पद्धतीत हे चार नगरसेवक निवृत्त न झाल्यास त्यांचे राजीनामे घेऊन इतर चार नवीन सदस्यांना पाठविण्याचा नवीन ट्रेंड एमआयएमने आणला आहे. २८ एप्रिल रोजी स्थायी समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीमधील १६ सदस्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. ड्रॉ पद्धतीत आपली चिठ्ठी उठू नये असे सर्वांनाच वाटत आहे. ड्रॉ मध्ये आपल्या नावाची चिठ्ठी आल्यावर अनेकांना जड अंत:करणाने का होईना स्थायीमधून निवृत्त व्हावेच लागेल. महापालिकेत ‘आर्थिक’गणिते स्थायी समितीच्या माध्यमातून सुटतात. त्यामुळे स्थायीत आपला क्रमांक लागावा म्हणून प्रत्येक नगरसेवकाची धडपड सुरू असते. यंदा ड्रॉ पद्धतीत एक किंवा दोन नगरसेवक निवृत्त झाले तरी एमआयएम सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेणार आहे. स्थायी समितीमधून त्यांना सक्तीने निवृत्त करण्यात येणार आहे. महापालिकेच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही पक्षाने अशा पद्धतीचा पायंडा पाडलेला नाही. स्थायी समिती सदस्याला राजीनामा देण्याचा अधिकार आहे. मात्र, हा राजीनामा कोणाला द्यावा हे कायद्यात कुठेच लिहिलेले नाही. नगरसेवकाचा राजीनामा घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. सदस्यही आयुक्तांकडे राजीनामा देतील. सोमवारी एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत स्थायीमध्ये प्रत्येक नगरसेवकाला एक वर्षाचा कार्यकाळ मिळावा म्हणून सर्व चार सदस्यांचे राजीनामे घेण्याचा निर्णय झाला. विरोधी पक्षनेतापदी पाच वर्षांमध्ये पाच नगरसेवकांना संधी मिळावी असाही निर्णय झाला. विरोधी पक्षनेता जहाँगीर खान यांचाही राजीनामा घेऊन त्यांच्याजागी नवीन विरोधी पक्षनेता निवडण्यात येईल. या स्पर्धेत फेरोज खान, गंगाधर ढगे आणि अय्युब जहागीरदार यांची नावे आहेत.
एमआयएम स्थायी सदस्यांचा राजीनामा घेणार
By admin | Updated: April 27, 2016 00:37 IST