जालना : अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक विद्यालयाने पर्यावरणाचे संवर्धन व रक्षण व्हावे, याकरीता एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांसोबतच ग्रामस्थांना वृक्षसंवर्धन करण्याचा कानमंत्र दिला आहे.विद्यालयाच्या वतीने पर्यावरण वनसंवर्धनाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड करून नक्षत्रवनही तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी लागावी म्हणून शाळेत वसुंधरा निसर्ग मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. २००६ पासून आजपर्यंत शाळेत एक हजार प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने चिंच, लिंब, करंज, सीसम, निलगिरी, बेल, मोह, आरजू, बदाम, पारिजातक, वड, पिंपळ, जांभूळ, चंदन आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांची लागवड करून त्याची शास्त्रशुद्धपणे जोपासणा केली जात आहे. विशेष म्हणजे विद्यालयाने आॅक्सिजन पार्कची स्थापना केली आहे. यामध्ये तुळस, कोरपड, कडीपत्ता, सदाफुली आदी वनस्पतींची लागवड केली आहे. नक्षत्रवनात २७ विविध झाडांची लागवड केली आहे. पर्यावरण विषयक चांगले कार्य केल्याबद्दल विद्यालयास आतापर्यंत तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्रितारांकित शाळा, पंचतारांकित शाळा, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विलास टकले, ए.एन. वीर, डी.व्ही. जाधव, पी. आर. अहिरे, सचिन टेकाळे, एस. एस. बुनगे, ओ.के. घुगे, एस.व्ही. जिगे, एस.बी. शेरे, डी.एन. पैठणे, व्ही.व्ही. मुळे, ए.बी. उंडे, बी.यू. कोकणी, एम. आर. मिसाळ, ए.बी. उगले, व्ही.पी. सपकाळ, व्ही.बी. घुले परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
राजुरेश्वर विद्यालय देतेय पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By admin | Updated: July 25, 2016 00:33 IST