छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र दिलेल्या मुदतीत सादर केले नाही. त्यामुळे तालुक्यांतील १२९ सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. यापूर्वी तीन तालुक्यांतील ७५ सदस्य अपात्र ठरविले होते.
जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या काळात २१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडून निकाल जाहीर करण्यात आले. या दोन्ही निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना १२ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. सिल्लोड तालुक्यातील २०२०-२१ मध्ये निवडणुकीत ४०७ सदस्य राखीव जागांवर निवडून आले होते. त्यापैकी १०५ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे यापैकी ६९ सदस्यांवर ४ मार्च रोजी अपात्रतेची कारवाई केली.
कन्नड तालुक्यात २०२०-२१ मध्ये झालेल्या ८० ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्यांपैकी ३४ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे ३४ पैकी २६ जणांविरुद्ध ६ मार्च रोजी अपात्रतेची कारवाई केली. कन्नड तालुक्यातच २०२२ मध्ये झालेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या ४० उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. या ४० पैकी ३४ सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली.