लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी १९ एप्रिलला होऊन २१ एप्रिल रोजी मतमोजणी झाली असून, नूतन महापौरांची निवड २२ मे रोजी मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून नूतन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे काम पाहणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.लातूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीला काठावर बहुमत आहे. ३६ नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत. तर काँग्रेस पक्षाचे ३३ आणि राष्ट्रवादीचा १ नगरसेवक नव्या सभागृहात आहे. विद्यमान नगरसेवकांचा कालावधी २० मे २०१७ पर्यंत आहे. नव्या नगरसेवकांची एक महिन्याअगोदर निवड होऊनही त्यांना कारभार करता आला नाही. २२ मे रोजी निवड झाल्यानंतर लातूर मनपात नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. या निवडीची तारीख विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी निश्चित केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. भाजपाला ३६ जागा मिळाल्या आहेत. काठावर बहुमत असलेल्या भाजपाला महापालिकेत पदाधिकारी निवडीमध्ये अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, महापौर कोण असावा, हे सर्वस्वी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हातात आहे. त्यांनी नूतन नगरसेवकांच्या बैठका घेऊन विचारविनिमय केला. मात्र या पदासाठी कोणाची निवड झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. महापौर कोण असेल, याचे कोणतेही संकेत त्यांनी दिले नाही. त्यामुळे उत्सुकता कायम असून, २२ मे रोजीच ते कळणार आहे.
नव्या महापौरांची निवड २२ मे रोजी होणार
By admin | Updated: May 9, 2017 23:39 IST