औरंगाबाद : नागेश्वरवाडी भागातील सुंदरनगर येथील रहिवासी विवाहितेने रविवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांनीच आपल्या मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप केला आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ घाटीत तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांचा रुद्रावतार पाहून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती, दीर आणि सासूला पोलिसांनी अटक केली आहे.सविता गणेश पोटे (२३, रा. सुंदरनगर, नागेश्वरवाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पैठण तालुक्यातील रजापूर येथे चार वर्षांपूर्वी सविता आणि गणेश यांचा विवाह झाला. त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे. भूखंड खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणावे, यासाठी पती, सासू आणि दीर हे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून सविता हिने रविवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेदरम्यान घरी छताच्या हुकाला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घाटीत अपघात विभागातील डॉक्टरांनी सविता हीस तपासून मृत घोषित केले. नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहाकडे येताच एकच आक्रोश केला. यामुळे तेथील वातावरण गंभीर बनले. यावेळी आरोपींनीच आपल्या मुलीस मारून टाकल्याचा आरोप करून आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे घाटीत काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गंभीरराव आणि कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. मृताचे वडील बाळू सर्जेराव यदमळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक ठाण्यात पती गणेश, सासू रेखा आणि दीर चेतन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आाल. पोलिसांनी आरोपींना अटक केली.
विवाहितेची आत्महत्या; घाटीत तणाव
By admin | Updated: October 10, 2016 01:10 IST