हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसरात मकरसंक्रांतीनिमित्त लागणाऱ्या पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात दुकाने लागली होती. तेथे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सणात वाण देण्याची पंरपरा कायम आहे. यात देण्यात येणाऱ्या विविध वस्तूंचे काही दिवसांपूर्वी दर कमी होते, परंतु मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी त्यात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर साहित्याचेही दर वाढले होते. गांधी चौकात तर गोड- धोड पदार्थांसह ऊस, बिबे, बोर, गाजर, हरभरा, जांब, वटाण्याच्या शेंगा आदी वाणात देण्यात येणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुगड्याद्वारे पूजा करण्याचा मान असल्याने, त्याला जास्त मागणी होती. महिलांची बांगड्यांच्या दुकानावरही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आकर्षक बांगड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मकरसंक्रातीनिमित्त साड्यालाही तेवढेच महत्त्व असल्याने, महिलांसाठी आकर्षक साड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. साड्यांच्या दुकानात कमीत कमी २५० रुपयांपासून ते ५ हजारापर्यंत साड्या दाखल झाल्या आहेत. आठवडाभरापूर्वी ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेल्या विक्रेत्यांची अचानकच ग्राहकी वाढली. त्यामुळे मकरसंक्रांतीनिमित्त अनेकांनी कामगार वाढविले होते. एकंदरीत बाजारपेठेत सायंकाळपर्यंत लाखोंची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून मिळाली. (प्रतिनिधी)
मकरसंक्रातीनिमित्त बाजार फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 23:13 IST