पैठण : येथील जायकवाडी परिसरात असलेली मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी ही महत्त्वाची संस्था पूर्ण विकसित झाल्यानंतर तिला आता औरंगाबादला हलविण्याचा घाट प्रशासकीय पातळीवर होत आहे. केवळ पैठण येथे जाणे-येणे गैरसोयीचे होत असल्याचे कारण पुढे करून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली व सुमारे २० वर्षे पैठण येथे कार्यरत असलेली ही संस्था स्थलांतर करण्याच्या निर्णयाने पैठणकरांमधे मोठी खळबळ उडाली आहे. पैठण येथे कार्यान्वित असलेली मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रबोधिनी १९९५ मध्ये स्थापन करण्यात आली होती. आजपर्यंत या संस्थेच्या उभारणीसाठी राज्य शासनाने इमारतीसह इतर सेवासुविधा व तंत्रज्ञानासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या संस्थेचे काळानुसार अपडेटेशन करण्यात आले. हजारो कर्मचारी या संस्थेत प्रशिक्षित झालेले आहते. आता राज्य शासनाने अचानक या संस्थेस पैठण येथून हलविण्याचा निर्णय घेतल्याने आजवर शासनाने केलेला खर्च वाया जाणार आहे. प्रबोधिनी ही संस्था आता औरंगाबाद पैठण रोडवरील मौजे नक्षत्रवाडी येथील शासकीय मालकीच्या असलेल्या गट क्रमांक ९ मधील २५ एकर जागेवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते. या जागेची शासकीय मोजणी करण्यासाठी राज्य शासनाने ४ लाख ५५ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे.
मराठवाडा प्रबोधिनी हलविण्याचा घाट
By admin | Updated: April 14, 2015 00:56 IST