औरंगाबाद : आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजासाठी आजचा काळा दिवस आहे. क्रांती चौकातून आरक्षणासाठी पहिला सर्वात मोठा मराठा मोर्चा निघाला होता. त्यानंतर अनेक मोर्चे निघाले, बांधवांनी बलिदान दिले. मात्र, आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारचा निषेध करत आंदोलक क्रांती चौक येथे आत्मक्लेश करण्यासाठी एकत्र आले.
१३, ७०० मराठा बांधवांवर गुन्हे दाखल आहेत. ५० आंदोलकांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. तरीही राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी कमी पडले. गरीब मराठा समाजास संधी मिळण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र, राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही. असा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे निराशा झाली असून आम्ही आंदोलन नाही तर आत्मक्लेश करण्यासाठी आलो असल्याचे यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आप्पासाहेब कुढेकर, ठोक मोर्चाचे रमेश केरे, दत्ता घुगरे, समाधान शिंदे, संतोष शिंदे यांनी सांगितले.
९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले प्रवेश रद्द होणार नाहीतराज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारार्ह नाही असं म्हणत न्यायालयानं समितीच्या शिफारसी फेटाळून लावल्या. मात्र मराठा आरक्षण कायद्याच्या माध्यमातून ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द होणार नाहीत, असा काहीसा दिलासा न्यायालयानं दिला. राज्य सरकारनं केलेला मराठा आरक्षणाचा कायदा घटनाबाह्य असल्याचं न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान म्हटलं.