औरंगाबाद : एरव्ही कोणताही मोर्चा म्हटले की, घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळते. मात्र मराठा समाजाच्या वतीने कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेला मूक मोर्चा अत्यंत शिस्तप्रिय होता. लाखोंचा सहभाग असलेल्या या मोर्चात विद्यार्थ्यांपासून ते सेवानिवृत्त प्राध्यापक, कामगार, उद्योजक, वकील, डॉक्टर्स आणि विविध राजकीय पक्षांतील, सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या मराठ्यांचा समावेश होता.हा मोर्चा कोणाच्याही नेतृत्वाखाली होणार नसून मराठा समाजाचा आहे, असे दोन दिवसांपूर्वीच संयोजन समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. आपल्या समाजाचा मोर्चा म्हणून शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी मंगळवारचा दिवस राखून ठेवला होता. विशेष म्हणजे अनेक जण यात सहकुटुंब सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता मोर्चाची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार बरोबर अकरा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर हा मोर्चा अत्यंत शिस्तीत सिल्लेखाना चौक, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटीचौक, शहागंजमार्गे विभागीय आयुक्तालयावर गेला. शहागंज येथे वैैजीनाथ काळे स्मृती मंचतर्फे पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले जात होते. शिवाय अन्य ठिकाणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पाणी पाऊच वाटप केले. एरव्ही कधीही घराबाहेर न पडणाऱ्या हजारो महिला काळ्या साड्या तर मुली आणि तरुणांनी काळे ड्रेस परिधान करून कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे ज्यांच्या अंगावर काळा ड्रेस नव्हता, त्यांनी दंडाला काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. शिवाय प्रत्येकाने शर्टाला काळ्या फिती चिकटवल्या होत्या. काही उत्साही तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत होते. कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणीही केली जात होती.
मराठा क्रांती मोर्चाने दिले शिस्तीचे धडे
By admin | Updated: August 10, 2016 00:29 IST