औरंगाबाद : सावधान, मनू व हिटलरचं राज्य अवतरलंय. जयभीम व लाल सलाम हातात हात घालून चालले पाहिजेत. कारण असतील तर हे दोघे मित्रच असू शकतील. शत्रू असण्याचे कारण नाही’ असे प्रतिपादन माकप नेत्या, माजी खासदार कॉ. वृंदा कारत यांच्यासह अनेक वक्त्यांनी केले. कॉ. डॉ. आदिनाथ इंगोले लिखित ‘बाबासाहेबांचे लोकशाही क्रांती तत्त्वज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन सायंकाळी तापडिया नाट्य मंदिरात वृंदा कारत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जनशक्ती प्रकाशनचे कॉ. डॉ. अशोक ढवळे हे होते. योग्य वेळी हे पुस्तक आल्याबद्दल प्रा. डॉ. विठ्ठल मोरे व प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी समाधान व्यक्त केले. मनोगतात डॉ. आदिनाथ इंगोले यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कम्युनिस्टांनी नीट समजून घेतले पाहिजे आणि आंबेडकरवाद्यांनी नीट मार्क्सवाद समजून घेण्याची गरज आहे आणि जयभीम व लाल सलाम हातात हात घालून उभा राहिला पाहिजे. बाबासाहेबांना कामगारवर्गाची लोकशाही हवी होती. आज संविधान मान्य नसलेले लोक सत्तेवर येऊन बसलेले आहेत. हे फार मोठे आव्हान आहे. या फॅसिझमविरोधी लढ्यात विजय आपलाच होणार असला तरी रक्तपात टाळता आला पाहिजे. डॉ. अहिरे म्हणाल्या, अंधेरा कायम रहे असे म्हणणाऱ्या शक्ती प्रबळ झाल्या आहेत. शेठशाही आणि भटशाही प्रबळ होत आहे. लोकशाही फसली की काय असे वाटू लागले आहे. अशा वेळी मार्क्स आणि डॉ. आंबेडकर हे शत्रू तर असूच शकत नाहीत. प्रारंभी, कॉ. शाहीर वसुधा कल्याणकर यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम झाला. नंतर कविसंमेलन रंगले.