सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे नमाज अदा करुन घरासमोर उभ्या असलेल्या एका वृध्द इसमाच्या डोक्यात मनोरूग्ण असलेल्या एकाने मोटारचा पाटा मारल्याने त्याचा औरंगाबाद येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी मनोरूग्ण असलेल्या शेख रहिम शेख अजीज कुरेशी (रा. बोरगाव सारवणी) या आरोपीला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेत मरण पावलेल्या वृद्धाचे नाव हाजी गुलाबखॉ महेताबखॉ (वय ८५, रा. बोरगाव बाजार) असे असल्याची माहिती पोलीस पाटील शेरु जमादार यांनी दिली.या घटनेनंतर गावात उलटसुलट चर्चेला उधान आले होते. काही काळ या गावात तणाव निर्माण झाला होता. त्या आरोपीस नागरिकांनी बदडले व हात पाय बांधून त्याला एका खोलीत डांबून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील शेरु जमादार यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके, स.पो.नि. मिलिंद खोपडे, कर्मचारी कुलकर्णी, पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)
मनोरूग्णाने केला वृद्धाचा खून
By admin | Updated: November 18, 2014 01:11 IST