छत्रपती संभाजीनगर : विद्रोहासाठी शुक्रवारी सकाळपासूनच मलिक अंबरी साहित्य नगरीत राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून कार्यकर्ते, रसिक व श्रोते दाखल होत आहेत. १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सर्वांसाठी विनामूल्य होते. यासाठी रसिकांची मोठी गर्दी होती.
दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे आश्रित असल्याचा आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केला. आधी राजकीय बनलेल्या या संमेलनाचे आता शासकीय आणि पक्षीय संमेलनात रूपांतर झाले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने १९९९ पासून अखिल भारतीय ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येतात. नाशिक, उदगीर, वर्धा व अमळनेर याठिकाणी तर कोट्यवधींचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुर्च्यांमुळे खजील झालेले मराठी साहित्य संमेलन आता दिल्लीश्वरांच्या आश्रयाला गेले आहे. विद्रोही साहित्य संमेलन मात्र मराठी मातीत पाय रोवून विषमतावादी, शोषक संस्कृतीविरोधात फुले, शाहू, आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे, असेही परदेशी यांनी म्हटले आहे. आमखास मैदानावर उभारलेल्या मलिक अंबर साहित्य नगरीत २ भव्य सभामंडप उभारण्यात आली असून, ३ दालनांमध्ये बाल मंच, युवा मंच यासह एकूण ४ विचार मंचांवर विविध कार्यक्रम होणार आहेत. दोन दिवसांमध्ये ६ परिसंवाद, १४ गटचर्चा, १ विशेष व्याख्यान होईल. काव्य पहाट मैफल, गजल संमेलन, अशी ४ कविसंमेलने व काही सत्रांत साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य संवाद होईल. सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी, कलादर्शन, लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्रदर्शन इ. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कथाकथनाच्या कार्यक्रमासह २ नाट्यवाचन, ३ एकपात्री प्रयोगासह २ एकांकिकांचे सादरीकरण या मंचावर होणार आहे. युवा कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल.
खास मंडपातील ८ कला दालनांत चित्रकाव्य, शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, रांगोळी, व्यंगचित्र, अशा ८ कला प्रकारांचे लाइव्ह सादरीकरण व प्रदर्शन होईल. ‘संविधान’ आणि ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ या विषयांवरील २ पोस्टर प्रदर्शने भरवण्यात येणार आहेत.