परभणी : महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार परभणी शहरातील प्रमुख चौकांमध्ये ३७ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे कॅमेरे चोवीस तास नजर ठेवून असणार आहेत. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातून होणार आहे.गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी एस.पी. सिंह आणि पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरात ३७ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. २२ जुलैपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी ३६ कॅमेरे हे ३ मेगा पिक्सलचे असून, २३ एक्स झूम क्षमतेचे आहेत. २०० मीटरपर्यंतच्या अंतरातील दृश्य या कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊ शकते. विशेष म्हणजे दिवसरात्र अशा दोन्ही वेळेस हे कॅमेरे दृश्य टिपणार आहेत. सदरचे कॅमेरे बहुउपयोगी असून, कायदा व सुव्यवस्था गुन्हे नियंत्रण, अतिरेकी कारवाईस प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण यासाठी उपयोगी ठरणार आहेत़ (प्रतिनिधी)इथे बसविले कॅमेरेपरभणी शहरातील डॉ़ आंबेडकर पुतळा येथे तीन, रेल्वेस्टेशनवर दोन, साठे पुतळा, डॉक्टर लेन दोन कॅमेरे, बसस्थानक प्रवेशद्वारावर दोन, बसस्थानकाजवळील मशिदीवर एक, हनुमान चौकात दोन, जेल कॉर्नर येथे चार, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तीन, विसावा चौकात एक, जि़प़ कन्या प्रशाला परिसरात एक, किंग कॉर्नर येथे दोन, आऱआऱ टॉवर येथे दोन, अष्टभुजा मंदिर परिसरात एक, मुल्ला मशीद परिसरात दोन, गांधी पार्क एक, सराफा बाजार तीन, खुतनी मशीद व गुजरी बाजार येथे दोन आणि शिवाजी चौकात तीन असे एकूण ३६ सीसी- टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ एक प्रमुख कॅमेराशहरातील ईदगाह मैदानावर प्रमुख कॅमेरा बसविण्यात आला आहे़ हा पीटीझी सीसीटीव्ही कॅमेरा असून, तो ३६० कोनात गोल फिरतो़ २३ एक्स झुम क्षमतेचा हा कॅमेरा असून, एक किमी अंतरापर्यंतची सर्व दृश्य तो टिपतो, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली़ पोलिस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्ष शहरात बसविण्यात आलेल्या सर्व कॅमेऱ्यांसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ या नियंत्रण कक्षातून शहरात बसविलेल्या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण होणार आहे़ यासाठी एक तज्ञ अभियंता आणि तीन पोलिस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत़ हे सीसीटीव्ही कॅमेरे मुंबई येथील केलट्रॉन प्रा़लि़ या कंपनीने पुरविले असून, कॅमेऱ्यांच्या प्रोजेक्टरची किंमत ५५ लाख रुपये एवढी आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणीजिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाची पाहणी २८ जुलै रोजी केली़ या निंयत्रण कक्षातून शहरातील दृश्य त्यांनी पाहिली़ यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची उपस्थिती होती़
३७ कॅमेऱ्यांची शहरावर नजर !
By admin | Updated: July 29, 2014 01:07 IST