लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेती तारण ठेवल्यानंतर उद्योग व्यवसायासाठी साडेतीन कोटींचे कर्ज बँकेकडून मिळवून देण्याचे आमिष दाखवून एक जणाला तब्बल ९ लाख ९० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. शैलेश बाबूराव कांबळे (रा. गादिया विहार, गारखेडा परिसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महादू दगडूजी पगारे (रा. सौजन्यनगर) यांची शरणापूर शिवारात १४ एकर १२ गुंठे शेती आहे. सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोपी आणि तक्रारदार यांची दीड वर्षापूर्वी ओळख झाली. आरोपीच्या मुलाची फीस भरण्यासाठी पगारे यांनी दीड वर्षापूर्वी त्यांना मदत केली होती. यानंतर आरोपीने तक्रारदार यांच्याशी जवळीक वाढविली. त्याने तो युनियन बँक आॅफ इंडियाचा वरिष्ठ वसुली अधिकारी असल्याचे सांगितले. त्याची बँक कं पनी सुरू करण्यासाठी कर्ज देत असल्याचे त्याने सांगितले. युनियन बँकेकडून तुम्हाला बेनटेक्सच्या दागिन्याची कंपनी टाकण्यासाठी ३ कोटी ५० लाख रुपये कर्ज देतो, तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी ३५ लाख रुपये कर्ज देतो. हे कर्ज काढून देण्याचे आमिष त्याने पगारे यांना दाखविले. त्यासाठी त्याने त्यांचे ओळखपत्र, जमीन सातबारा आणि इतर कागदपत्रे घेतली. २९ एप्रिल २०१६ रोजी त्याने कर्जासाठी तुमची कागदपत्रे योग्य असल्याचे सांगितले. कर्जाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ३५ हजार रुपये तर पत्नीच्या नावे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ८५ हजार रुपये घेतले. ही रक्कम पगारे यांनी रामदास वाघमारे आणि अरविंद कांबळे यांच्यासमोर जयभवानीनगर येथे दिली. यानंतर त्याने विविध वेळा फोनवर संपर्क साधून दोन्ही प्रोजेक्ट अहवाल तयार झाले. कर्जाची फाईल बँकेत पाठविली. बँकेने फाईल मंजूर केल्याचे सांगितले. कर्जासाठी अनामत म्हणून बँकेत टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्याचे सांगितले. यासाठी आरोपीने विश्वास संपादन करून त्याच्या नावेच धनादेश घेतले. रोख रक्कम आणि धनादेशाचे एकूण ९ लाख ९० हजार रुपये घेतले. कर्जाच्या आमिषाने आरोपीने अनेकांना गंडविल्याची माहिती तक्रारदार महादू पगारे यांना समजली. आरोपीने अक्षय लिहिणार, सतीश आदमाने, राजरत्न हिरे, राहुल भिंगारे, प्रवीण किरोळे आणि अन्य लोकांना कर्जाची फाईल मंजूर करून देण्याच्या आमिषाने फसविल्याचे समजले.
कर्जाचे आमिष दाखवून साडेनऊ लाखांचा गंडा
By admin | Updated: June 24, 2017 23:54 IST