उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयानेही वाहनावरील दिव्याच्या वापरासंबधी काठोर निर्देश दिले आहेत. मात्र पोलिस प्रशासनानेही त्यांच्या वाहनांवरील अंबर दिवे बदलत नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द करताच परिवहन कार्यालयाच्या वतीने पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून दिवे बदलण्याचे सांगितले. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर अंबर दिवे आहेत, याची माहिती घेवून संबधिताविरुध्द कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे परिवहन कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.शहरातील पोलिसांच्या वाहनावर अंबर दिवे असल्याचे लोकमत टीमने बुधवारी केलेल्या पाहणीत दिसून आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील महसुल विभाग व परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वाहनावरील दिवे काढून निळे दिवे बसवून नियमाची अमलबजावणी केली होती. मात्र कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस विभागाने , हे नियम धाब्यावर बसवित गाडीवरील अंबर दिवे अद्यापही कायम ठेवल्याचे दिसून आले होते. यावर लोकमत टिमने बुधवारी शहरातील पोलिस प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या वाहनावर अंबर दिवे असल्याचे वृत्त प्रसिध्द करताच याची गंभीर दखल परिवहन कार्यालयाने पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवून पोलिस प्रशासनातील वाहनावरील दिवे बदलण्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी लोकमतच्या वृत्तानंतर गाडीवरचे दिवे बदलण्यास सुरुवात केली असल्याचे असे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पोलिस अधिक्षकांना आरटीओचे पत्र
By admin | Updated: August 25, 2014 01:37 IST