शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर बुधवारी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा केवळ दुसरा डोस देण्यात येणार होता. यासाठी अनेक नागरिक सकाळी साडेसात वाजल्यापासूनच केंद्रांवर रांग लावून बसले होते. १० वाजता आरोग्य कर्मचारी आले. तोपर्यंत केंद्रावर १०० पेक्षाही अधिक नागरिक कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. यामध्ये ज्येष्ठांची संख्या लक्षणीय होती.
साडेदहा वाजता आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाला कुपन वाटप केले. कुपन मिळाल्याने आता लसही मिळणार याची जणू हमीच मिळाल्याने अनेकजण मनोमन सुखावले होते; पण तेवढ्यात पुढच्या १५- २० मिनिटांतच आरोग्य कर्मचारी पुन्हा बाहेर आले आणि पहिला डोस घेऊन ४५ दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले असतील, त्याच लोकांनी इथे थांबा, उर्वरित लोकांनी घरी जा, अशी सूचना दिली. यामुळे गोंधळून गेलेल्या नागरिकांनी पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांकडे विनवणी केली. मात्र, लसीकरणाची सिस्टीमच ४५ दिवसांच्या आत दुसरा डोस घेणाऱ्यांचे नाव स्वीकारत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचाही नाइलाज झाला होता.
हे फर्मान आल्यानंतर निम्म्याहून अधिक लोकांना लस न घेताच हताश होऊन परतावे लागले. त्यामुळे जवळपास अडीच-तीन तास फुकटच वेळ गेला आणि पुन्हा लसीकरणाला येऊ तेव्हाही असेच ताटकळत उभे राहावे लागेल, या विचारानेच अनेकजण त्रस्त झाले होते.