लातूर : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे़ पशुधनासाठी चाराच उपलब्ध नसल्याने पशुपालकांची परवड होत आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी साडे सहा लाख पशुधनासाठी रत्नागिरीहून पहिल्या टप्प्यातील ९ मेट्रिक टन चारा आला आहे़ लातूर जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामही अवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे हातचा गेला आहे़ दरम्यान, पशुधनासाठी चाराच उपलब्ध नसल्याने साडे सहा लाख पशुधनाची चारा -पाण्याअभावी परवड होत आहे़ जिल्ह्यातील चारा पूर्णपणे संपलेला असतानाही जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून चाऱ्याबाबत कुठलाही पाठपुरावा केला जात नाही़ याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवून चिडीचुप बसण्याचा प्रताप जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून केला जात आहे़ मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टंचाईची ही परिस्थिती लक्षात घेऊन लातूरच्या पशुधनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील प्लॅन्टवरून चारा मागविला आहे़ पहिल्या टप्प्यातील ९ मेट्रिक टन चारा सोमवारी उपलब्ध करण्यात आला असून, या पुढील कालावधीतही पशुपालकाच्या मागणीनुसार चाऱ्याची मागणी केली जाणार आहे़ पहिल्या टप्प्यातील उपलब्ध झालेल्या चाऱ्याचे वाटप अहमदपूर तालुक्यात व त्यानंतर शिरुर अनंतपाळ तालुक्यात केले जाणार आहे़ तसेच आवश्यकतेनुसार इतर तालुक्यातही चाऱ्याचा पुरवठा केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)
रत्नागिरीहून आला लातूरला चारा
By admin | Updated: May 16, 2016 23:44 IST