बिहार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवाराचा पराभव करण्यासाठी फोनवरून भाजप आमदाराकडे मदत मागितल्यावरून लालूप्रसाद यांना पुन्हा इस्पितळाच्या कक्षात हलविण्यात आले.
चारा घोटाळा प्रकरणात दोषी असून, विविध आजारांमुळे त्यांना राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (रिम्स) दाखल करण्यात आले होते.
रिम्सचे अतिरिक्त संचालक आणि झारखंडचे आरोग्य सहसंचालक डॉ. वाघमारे कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, लालूप्रसाद यांना सशुल्क कक्षातील ए-११ क्रमांकाच्या खोलीत हलविण्यात आले आहे.
बिहारमधील भाजपचे आमदार ललनकुमार पासवान यांना फोन करून बिहार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहण्यास सांगितल्याप्रकरणी झारखंड सरकारने बुधवारी चौकशीचे आदेश दिले होते.
आमदाराने दाखल केला एफआयआर...
दरम्यान, भाजपचे आमदार ललनकुमार पासवान यांनी लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तुरुंगवासात असताना फोन करून लालूप्रसाद यादव यांनी ललनकुमार यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवाराला पराभूत करण्यास मदत करण्याची आणि मोबदल्यात मंत्रिपदाचे आमिष दाखविले. दोघांतील फोनवरील संभाषणाची ध्वनिफित माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मंगळवारी रात्री आपल्या ट्विटरवरून जारी केली होती. ललनकुमार पासवान यांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीरपैंतीच्या आमदाराने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भादंवितील संबंधित कलमानुसार सतर्कता पोलीस ठाण्यात लालूप्रसाद यांच्याविरुद्ध एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल केला आहे.