लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्यसरकाने घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ९५७ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपापुढे नमते घेत राज्य सरकारने सुरुवातीला अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र, यास सर्वस्तरातून विरोध सुरू झाल्याने सरकारने एक पाऊल मागे घेतले. खरिपासाठी तातडीची मदत म्हणून पीककर्जाचे थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची अग्रीम रक्कम देण्याचा आदेश काढण्यात आला. या आदेशातील निकषांच्या अमलबजावणीबाबत बँक अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याने जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला अद्याप ही मदत मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आता शासनाने सरसकट दीड लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण आहे. जिल्ह्यातील थकित कर्जाचा आकडा दोन हजार कोटी रुपयांपर्यत आहे. एक लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या कर्जदारांची संख्या एक लाख ३८ हजार आहे. तसेच मध्यम मुदतीच्या (पुनर्गठन) कर्जदारांची संख्या पंधरा हजार ९५७ आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एक लाख व त्यापेक्षा जास्त पीककर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची संख्या एक लाख ९६ हजार आहे. या कर्जदारांपैकी निकषानुसार पात्र ठरणाऱ्या कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आगामी काळात बँक अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. त्याचबरोबर या वर्षी एक हजार ४११ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही बँकांना पूर्ण करावे लागणार आहे.
दीड लाखावर शेतकऱ्यांना कर्जमाफी...!
By admin | Updated: June 26, 2017 00:39 IST