उस्मानाबाद : सलग तीन वर्षांत दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर गतवर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठे आणि मध्यम प्रकल्पही तुडूंब भरले. परंतु, मागील काही महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. असे असतानाच शेतीपिकासाठीही प्रकल्पातून वारेमाप पाणीउपसा सुरू आहे. परिणामी प्रकल्पसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सद्यस्थितीत दोनशेवर प्रकल्पांमध्ये मिळून ३० ते ३२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भीषण टंचाईला तोंड द्यावे लागू शकते. ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान अनेक प्रकल्पांवर शेकडोंच्या घरात मोटारींद्वारे पाणीउपसा सुरू होता. काही ठिकाणी चर खोदून शेतीला पाणी दिले जात असल्याचेही समोर आले. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.लोहारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लोहारा शिवारातील लघु पाझर तलावातून होणारा पाणीउपसा सुरूच राहिल्यास आगामी काही दिवसांत शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा पाणीउपसा थांबवावा, असे पत्र नगर पंचायतीने पाटबंधारे विभागाला दिले आहे. परंतु, या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याने येथून अद्यापही पाणीउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र. ८ लोहारा अंतर्गत चार लघुपाझर तलाव व सात साठवण तलाव येतात. यामध्ये अचलेर येथील एका लघु पाझर तलावात ४२.११ टक्के व दुसऱ्या साठवण तलावात ५६.७१ टक्के पाणीसाठा वगळता इतर तलावात दहा ते पंधरा टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे. भोसगा, जेवळी १ व जेवळी २, माळेगाव व हिप्परगा रवा साठवण तलावात झिरो टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे. लोहारा शिवारातील लघु पाझर तलाव पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. पण कॅनॉल लिकेज होते. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात होते. सध्याही या तलावावरून दिवस-रात्र शेतकरी पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे येथे सध्या केवळ ४.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लोहारा शहराला पाणीपुरवठा करणारी विहीरही याच तलावात असून, पाणी उपसा असाच सुरु राहिल्यास येत्या काही दिवसांत शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे लोहारा नगरपंचायतीने हा पाणीउपसा बंद करावा, असे पत्र उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र. ८ लोहारा यांना दिले आहे. परंतु, याकडेही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने पाणी उपसा सुरुच असल्याचे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून आले. या संदर्भात उपविभागीय अभियंता एस.एम.कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
पाण्याचा बेसुमार उपसा !
By admin | Updated: April 8, 2017 00:18 IST