वाळूज महानगर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने एका २२ वर्षीय युवकाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यास जखमी केले. नंतर आपल्या दुचाकीला बांधून फरफटत नेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री राजुरा शेतवस्तीवर घडली.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी सुनील बोबडे (रा. राजुरा, ता.गंगापूर) याला गावातील त्याचाच मित्र सूरज सावंत (२२) याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत, असा संशय होता. त्यातूनच तो सूरजचा काटा काढण्याची योजना आखत होता. अखेर बुधवारी त्याने सूरज यांच्या मोबाईलवर संपर्क साधून ‘माझ्या घरी कुणी नाही, दारू घेऊन ये, पार्टी करू’ असे सांगितले. लगेच सूरजने होकार दिला. त्याची दुचाकी (क्रमांक एमएच-२० एझेड ७३४४) वर जाऊन एका ढाब्यावरून त्याने दारूची बाटली घेतली. तेथून सरळ तो सुनीलच्या शेतवस्तीवर गेला होता. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोघांची पार्टी सुरू झाली. मद्यपान करण्यास सुरुवात केली. यावेळी सुनीलने ठरविल्याप्रमाणे सूरज यास जास्त दारू पाजली. मग त्याने अनैतिक संबंधाचा विषय छेडून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुनीलने सूरज यास तुझ्यामुळे माझ्या संसाराचे वाटोळे झाले असून, त्याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. सुनीलने कुऱ्हाड डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले. नंतर सूरजचे हात-पाय बांधून दुचाकीला दोरी बांधून त्यास फरफटत घेऊन निघाला. जीव वाचविण्यासाठी सूरजने मदतीसाठी आरडाओरडा केल्यामुळे लगतच्या शेतवस्तीवरील दत्तू बोबडे व इतरांनी येऊन सूरजची सुटका केली. सूरज यास त्यांच्या नातेवाईकांनी रात्री शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी सुनील बोबडेविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे करीत आहेत.
कुऱ्हाडीचे घाव घालून दुचाकीने फरफटत नेले
By admin | Updated: April 28, 2016 23:54 IST