खुलताबाद : यंदाच्या वर्षी मुबलक पाऊस असल्याने खुलताबाद, दौलताबाद, वेरूळ परिसरातील डोंगरदऱ्यांत सीताफळे मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर दौलताबाद ते वेरूळदरम्यान ठिकठिकाणी सीताफळ विक्रीस आली असून पर्यटक, भाविक वाहने थांबवून सीताफळ खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून डोंगरदऱ्यात व परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर सीताफळाची झाडे आहेत. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ही झाडे सीताफळांनी चांगलीच बहरली आहे. फळे पिकायला सुरुवात झाली असून अनेकजण औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ही फळे विक्रीसाठी बसत आहेत. याच मार्गावर धार्मिक तसेच पर्यटनस्थळे असल्यामुळे पर्यटकांचा मोठा राबता आहे. जागोजागी पर्यटक गाड्या थांबवून कोणत्याही रासायनिक खते, औषधीविरहित असलेला हा रानचा मेवा विकत घेण्यासाठी गर्दी करीत आहेत.
चौकट....
परिसरातील अदिवासी, शेतकरी, महिलांना रोजगार
परिसरातील डोंगरदऱ्यांत मुबलक प्रमाणात सीताफळांची झाडे आहेत. या झाडांवरून आदिवासी महिला, शेतकरी फळे तोडून ते विक्रीसाठी खुलताबाद-औरंगाबाद रस्त्यावर ठेवतात. दीडशे ते दोनशे रुपयांना सीताफळाची एक टोकरी विक्री केली जात आहे. यामुळे आदिवासी महिलांना तसेच शेतकऱ्यांना सीताफळ विक्रीतून रोजगार मिळाला असून भाविक व पर्यटकांची आयती बाजारपेठ मिळाल्याने सीताफळे हातोहात विक्री होत आहेत.
फोटो कॅप्शन : खुलताबाद-औरंगाबाद महामार्गावर कागजीपुरानजीक सीताफळ विक्री करणाऱ्या महिला.
260921\1817-img-20210926-wa0070.jpg
खुलताबाद- औरंगाबाद महामार्गावर कागजीपुरा नजीक सीताफळ विक्री करणा-या महिला दिसत आहे.