श्यामकुमार पुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : तालुक्यात एकूण ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात मतदारांनी नवतरुणांसह ज्येष्ठांना कौल दिला आहे. तालुक्यात यंदा चुरशीची लढाई झाली असून, अनेक गावातील दिग्गजांचा पराभव करत नवतरुणांनी विजय मिळवला. केऱ्हाळा गावातील अबुतालेब गणी पटेल या २१ वर्षांच्या तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लोकांनी निवडून दिले. तर याच गावातील सर्वाधिक वयाचे उमेदवार असलेले शेख करीम महेबूब यांना ७४ व्या वर्षी लोकांनी मतदानरूपी कौल दिला. गावासाठी काम करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर त्यासाठी वयाची कोणतीही अट नाही, हेच लोकांनी दाखवून दिले.
एकाच गावात मतदारांनी २१ व ७४ वर्षीय उमेदवाराला निवडून दिल्याने केऱ्हाळा गावाचे नाव चर्चेत आले आहे. समाजाबद्दल काम करण्याची जिज्ञासा व क्षमता असेल तर तुम्हाला कोणीही नाकारू शकत नाही. तुमच्या विरोधात कोणीही मातब्बर उभा राहिला तरी तुमचा विजय नक्कीच होणार आहे, याची प्रचिती तालुक्यातील अनेक गावांच्या निवडणुकीत दिसून आली. मतदारांनीही यंदाच्या निवडणुकीत नवतरुणांना संधी दिली आहे. वयाची विशी पार केलेल्या अनेक नवतरुणांनी या निवडणुकीत हिरिरीने सहभाग घेतला होता. याचवेळी चाळीस ते पन्नास वयोगटातील उमेदवारांनाही काम करण्याची संधी मिळाली आहे. तसेच ५० ते ६० वर्ष वयोगटातील उमेदवारांनाही तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये मतदारांनी निवडून दिले आहे.
------------
निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती : ८३
निवडून आलेले एकूण सदस्य : ८०६
निवडून आलेल्या महिला सदस्य : ४४२
----------------
संधीचे सोने करणार
राजकारनात युवकांनी पुढे यावे असे सगळेच म्हणतात. पण युवकांना संधी देतांना आपली कोंडी होऊ नये याची अनेक मातब्बर काळजी घेतात. त्यामुळे तरुणांना हवी तशी संधी मिळत नाही. जात, कुटुंब अशा अनेक भानगडी आहेत. पण केर्हाळा गावातील जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. त्या संधीचे मी सोने करणार आहे. गावात अनेक विकासकामांचा अजेंठा घेऊन मी काम करणार आहे. - अबुतालेब गनी पटेल, नवनिर्वाचीत सदस्य.
----
२५ वर्षांनंतर दिली पुन्हा संधी
गावाचा काय पालट करणार आहे. मला ७४ व्या वर्षी संधी दिल्याने मी गावकर्यांचा आभारी आहे. त्या संधीचे मी गावाच्या विकासात्मक कामात करणार आहे. आदर्श गाव हेच माझे स्वप्न आहे. सरपंचपदावर विराजमान होऊन ही कामे अतिगतीशिल करता येईल. तरीही जी जबाबदारी मिळेल त्याचे सोने करू. - शेखकरीम शेख मेहबुब, ज्येष्ठ सदस्य
---------
७४ वर्षी देखील दिला कौल
के-हाळा ग्रा.पं. निवडणुकीत यंदा चर्चेचा विषय ठरला तो सर्वात ज्येष्ठ उमेदवार शेख करीम यांचा. करीम यांचा जन्म १९४६ साली झालेला आहे. पंचवीस वर्षांपुर्वी ते ग्रा.पं. सदस्य होते. तर सोसायटीचे संचालक म्हणून निवडून आले होते. काही अंशी राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी होता. आता जनतेने ७४ व्या वर्षी पुन्हा त्यांना संधी दिली आहे. (फोटो)
के-हाळ्याच्या पटेल फक्त २१ वर्षाचा
केर्हाळ्याचा अबुतालेब गनी पटेल यांचा जन्म ७ ऑक्टोंबर १९९९ ला झाला आहे. २१ वर्ष तीन महिने पुर्ण होत असतानाच गावातील निवडणुकीत त्यांनी उडी घेतली. विशेष म्हणजे त्यांना कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही. गावाकर्यांनी सुशिक्षित व होतकरू उमेदवार म्हणून कौल दिला. ( फोटो)