सितम सोनवणे लातूरभारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त परिस्थिती आहे. तसेच काश्मीर खोऱ्यातही तणावग्रस्त परिस्थिती असल्याचा परिणाम थेट लातूरला येणाऱ्या सफरचंदावर झाला असून, आठवड्याला ४०० टन येणारे सफरचंद आता २०० टनांनी घटले असून, २०० टन सफरचंद लातूरच्या फ्रुट मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत. सफरचंदाबरोबरच बाजारात सीताफळ, अंजीर, बोर अशी फळेही बाजारात आली आहेत. काश्मीर खोऱ्यातील तणावग्रस्त परिस्थितीचा परिणाम व्यापारावरही होत असून, लातूरच्या फ्रुट मार्केटला प्रति आठवड्याला २५ ट्रकमधून सुमारे ४०० टन सफरचंद लातूरच्या फ्रुट मार्केटला विक्रीसाठी येतात. काश्मीरमधील डेलिशन या सफरचंदाला लातूर जिल्ह्यात चांगलीच मागणी आहे. खायला गोड व उच्च गुणवत्तेचा सफरचंद असल्याने काश्मीर भागातील सोफियन मार्केटमधील रामनगरी, बटणपूर, पिंजोरा आदी भागांतील माल हा लातूरकरांच्या पसंतीला उतरतो. तर सोपोर भागातील माल हा मध्यम गुणवत्तेचा असून, तो लातूरच्या बाजारात ८० ते १०० रुपये दराने उपलब्ध आहे. तर महाराजा सफरचंद हे खायला थोडेसे अंबुस असल्याने हा माल लातूरच्या मार्केटमध्ये न येता बांगलादेशकडे विक्रीसाठी जातो. मागील तीन महिन्यांपासून काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे २५ ट्रकने ४०० टन येणारा माल आता १२ ते १३ ट्रकच्या माध्यमातून सुमारे २०० टन येत आहे. परिणामी, दोनशे टनांची घटही झाल्याचे बरकत फ्रुट मार्केटचे प्रमुख हाजी बरकत बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काश्मिरी सफरचंदाची आवक निम्म्याने घटली
By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST