औरंगाबाद : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरीच कनिष्ठ अधिकाऱ्यांचा दरबार भरतो आहे. त्यामुळे अनेक अधिकारी मुख्यालयात, विभागात न येता वरिष्ठांच्या घरीच संचिका पूर्ण करण्यासाठी ‘मैफल’ जमवीत असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला. आजच्या बैठकीला एलबीटी, आरोग्य, गुंठेवारी विभागातील अधिकाऱ्यांची गैरहजेरी होती. पुढच्या बैठकीपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावावी. तसेच येत्या आठवड्यात कोणत्या अधिकाऱ्यांच्या घरी कनिष्ठ अधिकारी जाऊन संचिकांवर स्वाक्षऱ्या आणतात, याचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी तंबी सभापती विजय वाघचौरे यांनी दिली. सभापती झाल्यानंतर त्यांची आज पहिलीच बैठक होती. सभापती म्हणाले, अधिकारी घरी बसून कार्यालयीन कामे करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी अधिकाऱ्यांनी ३ ते ५ यावेळेत मनपात असणे गरजेचे आहे.उपायुक्त सुरेश पेडगावकर हे दालनात दोन महिन्यांपासून उपलब्ध नसतात. त्यांना कार्यमुक्त केले की नाही हेदेखील कळत नाही. त्यांच्या सेवेत वर्ग-२ चे अधिकारी, कर्मचारी आहेत.कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून काम करीत असतील. त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे गोपनीय तक्रार करावी, असे आवाहन सभापतींनी केले.सुटीची सूचना आठ दिवस आधीयापुढे दर आठवड्याला स्थायी समितीची बैठक होणार आहे. अधिकाऱ्यांना बैठकीला यायचे नसेल तर त्यांनी आठ दिवस आधीच रजेची विनंती करावी. ऐनवेळी रजा घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सभापतींनी दिला.
पालिकेतील वरिष्ठांच्या घरी भरतो कनिष्ठांचा दरबार
By admin | Updated: July 4, 2014 01:10 IST