नांदेड : गत काही दिवसांपासून नांदेडच्या तापमानात वरचेवर वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ४४.२ अंश नोंदल्या गेल्याची माहिती एमजीएमच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने देण्यात आली. गेल्या दहा वर्षांत जूनमधील सर्वाधिक तापमानाची नोंद यंदा झाली़शुक्रवारी तापमानातील आर्द्रता ४१ टक्के असल्यामुळे उष्णता वाढली होती. परिणामी शहरवासिय वाढत्या उष्म्याने घामाघूम झाले होते. गत आठ दिवसांपासून शहराच्या तापमानात सतत वाढ होत आहे. मंगळवारी कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस, बुधवारी कमाल ४२.४, शुक्रवारी कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. पुढील दोन-तीन दिवस तापमान वाढत राहील, अशी माहिती एमजीएमच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. वाढत्या उन्हामुळे सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नेहमी गजबजणाऱ्या रस्त्यांवरची वाहतूक तुरळक प्रमाणात दिसून येत आहे. दुपारी दोन ते चार दरम्यान रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. जुना मोंढा, शिवाजी चौक, रेल्वे- स्थानक, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, अण्णाभाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, देगलूरनाका आदी भागातील रस्त्यांवर दुपारच्यावेळी शुकशुकाट दिसून येत आहे. शहरवासिय डोक्याला रुमाल, टोपी, चष्मा असल्याशिवाय दुपारच्यावेळी बाहेर पडायला धजत नाहीत. प्रत्येकजण उन्हापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात दिसत होते़ (प्रतिनिधी)नांदेड @४४़२गेल्या दहा वर्षांत जूनमध्ये प्रथमच तापमान ४४ अंशांवर गेल्याची माहिती हाती आली आहे़ मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून आठवडाभरात राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़ तर दुसरीकडे पुढील दोन ते तीन दिवस तापमानात अशीच वाढ राहण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे़ त्यामुळे तापमानाचा मान्सूनपूर्व तडाखा नांदेडकरांना हैराण करणार हे मात्र नक्की़
जूनमध्ये सूर्य ओकतोय आग
By admin | Updated: June 7, 2014 00:25 IST