औरंगाबाद : शहरातील मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने फिरते पथक स्थापन केले आहे. या पथकाने दोन महिन्यांपूर्वी ब्रिजवाडी येथून एक गाय पकडून आणली. या गायीने कोंडवाड्यात एका वासराला जन्म दिला. अन्नाअभावी दोन दिवसांत वासरू मरण पावल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. कोंडवाडा म्हणजे एकप्रकारे कारागृह असल्याचा धक्कादायक खुलासाही दोषी डॉक्टरांनी केला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले.ब्रिजवाडी येथील मंगलाबाई जाधव यांच्या मालकीच्या दोन गायी मनपाच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी पकडून आणल्या. या गायी पकडून आणताना जाधव यांना कोणीही कल्पना दिली नाही. मंगलाबाई यांनी गायींचा अनेक ठिकाणी शोध घेतला. चार दिवसांपूर्वी त्यांना समजले की, गायी सिद्धार्थ उद्यान परिसरातील कोंडवाड्यात आहेत. त्या तेथे आल्या. त्यातील एक गाय गाभण होती. गाय जनल्याचे निदर्शनास आले; मात्र वासरू आजूबाजूला नव्हते. कर्मचाऱ्यांना विचारले असता २ मार्च रोजी गायीने एका वासराला जन्म दिला होता. दुसऱ्याच दिवशी ते मरण पावले, असे सांगण्यात आले. गायी परत हव्या असतील तर १३ हजार ३०० रुपये दंड भरावा लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. वासरू मरण पावल्याचा धक्का मंगलाबाई यांना बसला होता. गायींवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोंडवाड्याजवळ त्या हताश होऊन बसल्या. याच वेळी महापौर तेथे आले. त्यांनी माहिती विचारली असता गायीचे वासरू मरण पावल्याचे सांगण्यात आले. हा धक्कादायक प्रकार पाहून महापौर कोंडवाड्यात पोहोचले. तेथील विदारक चित्र पाहून महापौर अवाक् झाले. कोंडवाड्याचे प्रमुख डॉ. शाहेद शेख यांनी नमूद केले की, साहेब, कोंडवाडा म्हणजे कारागृह...येथे सोयी-सुविधा नसतात. हे वाक्य ऐकून महापौर अधिक खवळले. मुक्या प्राण्यांना कारागृह काय माहीत. येथे येणाऱ्या प्राण्यांना चारा, पाणी का देण्यात येत नाही. यावर अधिकारी निरुत्तर झाले.
मनपाचा कोंडवाडा नव्हे, हे तर कारागृह
By admin | Updated: March 22, 2016 01:31 IST