बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : व्यापारात झालेला तोटा, कर्जदारांचा वाढता तगादा आणि झटपट पैसे कमावण्याची हाव यामुळे पीपल्स बँकेच्या बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपींनी अनेकांच्या नावावर कर्ज काढले. त्यासाठी कोट्यवधीचे बनावट सोने तारण म्हणून बँकेत ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.बहुचर्चित जालना पीपल्स बँकेच्या बदनापूर शाखेत बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार मंत्री व त्याची मुले गोरव मंत्री, प्रितेश मंत्री हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर रविवारी ताब्यात घेतलेला गोल्ड व्हॅल्युअर विनायक विसपुते यास बदनापूर न्यायायलाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत मंत्री पितापुत्रांनी पोलिसांकडे अनेक बाबींचा खुलासा केला आहे. सोने व्यापारी असलेला राजकुमार मंत्री जेपीसी बँकेत तारण ठेवण्यासाठी येणारे सोने तपासून द्यायाचा, तर मुलगा प्रितेश हा याच बँकेत नोकरीस होता. दरम्यानच्या काळात राजकुमार मंत्री याने कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू केला. व्यवहारात तोटा झाल्यामुळे देणी वाढल्याने राजकुमार मंत्री अडचणीत आला होता. जेपीसी बँकेच्या बदनापूर शाखेत कार्यरत असलेला विनायक विसपुते यास राजकुमार मंत्रीच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती होती. विसपुते सुद्धा झटपट पैसे कमावण्यासाठी संधी शोधत होता. त्यामुळे दोघांनी संगनमत करून बनावट सोने तारण ठेवून कर्ज उचलण्याचे ठरवले. कापसाच्या व्यापारामुळे राजकुमार मंत्रीची अनेक शेतकरी व कामगारांशी ओळख होती. ओळखीतून काहींचा विश्वास संपादन करत त्यांनी कोरे बाँड व कागदांवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन जेपीसी बँकेच्या बदनापूर शाखेत खाते उघडले. आपल्याकडील बनावट सोने शेतकऱ्यांच्या नावावर तारण ठेऊन दोन ते सहा लाखांपर्यंत कर्ज उचलले.
पैसे कमविण्याचा हव्यास भोवला!
By admin | Updated: June 13, 2017 00:59 IST