छत्रपती संभाजीनगर : पुण्याच्या नामांकित आयटी कंपनीतील अभियंता समाधान महादेव उंबासे (२३, रा. हिमालया रेसिडेन्सी, खडी रोड, बीड बायपास) हा तरुणच उत्तर प्रदेशवरून रेल्वेतून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची तस्करी करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्याच्यासह त्याचा एजंट कान्हा ऊर्फ कृष्णा अण्णा लष्करे (२५, रा. शिवाजीनगर) याला रंगेहाथ अटक केल्याचे निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले.
समाधान पुण्याच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत अभियंता असून सध्या घरूनच काम करतो. कोरोना काळात सर्वत्र निर्बंध असताना तो नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या तस्करांच्या संपर्कात आला. त्याच्या विक्रीतून अधिकचे पैसे मिळणे सुरू झाल्याने त्याने थेट उत्तर प्रदेशच्या मुख्य तस्करांसोबत हातमिळवणी केली. शहरातील त्याचा शाळकरी मित्र कान्हामार्फत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विक्री सुरू केली. एनडीपीएस पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांना एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून समाधान व कान्हाच्या रॅकेटविषयी माहिती मिळाली होती.
मनमाडला घेतो पार्सलसमाधान उत्तर प्रदेशवरून रेल्वेने सजावटीच्या साहित्याच्या नावाखाली पार्सल मागवतो. शहरात पकडले जाण्याच्या भीतीने तो ते पार्सल मनमाड रेल्वेस्थानकावर स्वीकारतो. आठवड्यापूर्वीच त्याने ५० बॉक्स विक्री केले होते. रविवारी पुन्हा त्याने कान्हाला ७०० गोळ्यांची ऑर्डर घेण्यासाठी मनमाडला पाठवले. बागवडे यांनी सोमवारी पथकासह शिवाजीनगरमध्ये कान्हाला सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यानंतर समाधानच्या मुसक्या आवळल्या.
दामदुप्पट नफासमाधान एक स्ट्रीप जवळपास ३०० रुपयांना खरेदी करुन त्याची १२०० रुपयांपर्यंत विक्री करतो. एकदाच दहा स्ट्रीपचा बॉक्स घेतल्यास ८ हजाराला विकतो. त्यात कान्हाला विक्रीमागे कमिशन देतो. त्याच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.