शास्त्रीय नृत्याला राज्य शासनाने प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा जुन्या पिढीतील प्रख्यात नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्या कन्या व नृत्यतज्ज्ञ शमा भाटे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित शास्त्रीय नृत्यावरील राष्ट्रीय कार्यशाळेसाठी त्या शहरात आल्या होत्या. शास्त्रीय नृत्याला राज्य शासनाने प्रोत्साहन द्यावे कथ्थक या नृत्य प्रकारात तुमच्या मते महाराष्ट्राचे योगदान काय? - महाराष्ट्राला संगीताची मोठी परंपरा आहे. परंतु महाराष्ट्राच्या नृत्य प्रकाराला म्हणजेच लावणीला ग्लॅमर नव्हते. कथ्थक या नृत्य प्रकाराला महाराष्ट्राने अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार संगीताची जोड दिली आहे. बाहेरचे कित्येक कलावंत आपल्या कथ्थक नृत्यात वापरल्या जाणाऱ्या संगीताची तारीफ करतात. रोहिणी भाटे यांच्या योगदानाबद्दल सांगा. - कुठल्याही चांगल्या घरातील महिला बाहेर जाऊन नृत्य करते आहे, हे त्याकाळी समाजाला पटण्यासारखे नव्हते. त्या काळात रोहिणीतार्इंनी कथ्थकला मान मिळवून दिला. विचारांची घट्ट बांधणी मनात रुजवून इंटेलेक्च्युअल पद्धतीने नृत्य करणे त्यांनीच शिकविले. त्या विचार करून नृत्य करणाऱ्या एक विद्वान नर्तकी होत्या, असे मला वाटते. कथ्थकला रोहिणीतार्इंनी एक वेगळा विचार दिला आहे. पॉप डान्सच्या जमान्यात शास्त्रीय नृत्य कुठे तरी मागे पडते आहे, असे वाटते का? - नाही. मला तरी असे अजिबात वाटत नाही. शास्त्रीय नृत्याला पॉप डान्ससारखे ग्लॅमर निश्चितच नाही. आजही माझ्याकडे येणारे विद्यार्थी आठ-आठ तास न थकता कसून सराव करतात. नृत्यासाठी कोणतेही परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असते. नृत्य शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कायम वाढतेच आहे. अनेक तरुण मुलं तर शास्त्रीय नृत्याकडे आजही करिअर म्हणून पाहत आहेत. राधा-कृष्ण सोडून काही नवीन बदल कथ्थकमध्ये झाले आहेत का? - कृष्ण आणि राधा यांच्या लीला नृत्यातून दाखवणे, हा तर कथ्थकचा प्राण आहे. आता त्यात काही तरी नवीन दाखविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कस्तुरबा यांची गोष्ट, स्त्रीभ्रूणहत्या अशा सामाजिक विषयांनाही आम्ही नृत्यरूपाने स्पर्श करण्याचा प्रयोग केला आहे. तुमच्या ‘क्रिष्ण द लिबरेटर’ या प्रयोगाविषयी काही सांगा. - मुळात कृष्ण हे एक तत्त्व मानून आम्ही या प्रकाराची निर्मिती केली आहे. ‘कालिया मर्दन’चा प्रसंग म्हणजे आजच्या काळातील पाणी प्रदूषण असे मानले जाते. यात कृष्ण पाण्याचे प्रदूषण रोखून त्या दुष्ट शक्तीवर मात करतो आणि पुन्हा सगळे वातावरण निर्मळ होते, असे दाखविण्यात आले आहे. तसेच ‘माखन चोरी’ हा विषय आजच्या निर्यातीशी जोडला आहे. त्या काळात गोपिका लोणी मथुरेच्या बाहेर विकण्यासाठी नेत असत, त्यामुळे स्थानिक लोक लोण्यापासून वंचित राहत होते. हे थांबविण्यासाठी कृष्ण ‘माखन चोर’ झाला. तसेच आजच्या काळात इथे बनणाऱ्या अनेक वस्तू निर्यात केल्या जातात. आपल्याला जास्त किंमत मोजून त्या विकत घ्याव्या लागतात. अशा प्रकारे काल आणि आजची सांगड या माध्यमातून घालण्यात आली आहे. सवाई गंधर्व महोत्सवासारखे संगीतात होणारे कार्यक्र म नृत्यात का होत नसावेत? - महाराष्ट्राबाहेर असे खूप कार्यक्रम होतात. विशेषत: दक्षिण भारत आणि उत्तर भारतात होतात. महाराष्ट्रातही पुणे- मुंबई भागात असे कार्यक्रम होत असतात, पण त्या कार्यक्रमांचे स्वरूप मर्यादित असते. मला वाटते, महाराष्ट्र शासनाची नृत्याबाबत असणारी उदासीनताच याला जबाबदार आहे. यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. ल्लल्लल्ल
मुलाखत : नृत्यतज्ज्ञ शमा भाटे यांची अपेक्षा
By admin | Updated: December 16, 2015 00:13 IST