गोकुळ भवरे, किनवटकिनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत त्यांना सर्व समस्या सोडवू तसेच प्रशासन आपल्याबरोबर असल्याचा विश्वास दिला. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास ग्रामसभा संपली.विभागीय आयुक्त जैस्वाल म्हणाले, ग्रामस्थांंचे सहकार्य असल्याने येथे अनेक शासकीय योजना आल्या आहेत. जनतेच्या सहकार्याशिवाय योजना यशस्वी होऊ शकत नाही. शासकीय योजना राबविताना ग्रामस्थांचे सहकार्य असल्याची बाब चांगली असल्याचे प्रशंसनीय उद्गार त्यांनी काढले.या ग्रामसभेत आयुक्तांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले तसेच तत्काळ मजुरी दिली. हा उपक्रम पहिल्यांदाच किनवट दौऱ्यात राबविण्यात आल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. आयसीआयसीआय बँकेमार्फत मजुरांना मग्रायोजनेची मजुरी वाटप केली जाणार आहे. यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल आणि मला मजुरी मिळाली नाही, या तक्रारी होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. मुलांना शाळेत पाठवा, त्यांना शिकवा असे आवाहनही त्यांनी केले. पाऊस लांबल्याने किनवट तालुक्यावर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सावट दूर होईल आणि येत्या काळात चांगला पाऊस पडेल याची मला खात्री आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. सरपंच पंडित व्यवहारे व ग्रामसेवक अतुल गावंडे यांनी विभागीय आयुक्त जैस्वाल यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सहशिक्षक सुरेश पाटील यांनी केले. तत्पूर्वी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तहसीलदार शिवाजी राठोड, बीडीओ डॉ. नामदेव केंद्रे, तालुका कृषी अधिकारी संजय कायंदे, माहुरचे बीडीओ पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंद्रे, नाईकवाडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डाखोरे, सहायक अभियंता देवणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमावार आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. किनवटला प्रमुखांची आढावा बैठककिनवट तालुक्यातील कनकवाडी गावाला भेट देण्यापूर्वी औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी किनवट येथे गुरुवारी सर्व प्रमुखांची आढावा बैठक घेतली. वन हक्क कायदा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी प्रमुखांना दिल्या. यावेळी गोवर्धन मुंडे, रमेश खुपते, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर, केंद्रप्रमुख मडावी, पोलिस पाटील विलास सोळंके, उपसरपंच जयवंतराव जाधव, आत्माराम भिसे, गावकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कनकवाडीवासियांशी संवाद
By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST