सिल्लोड : मुलीला चांगले नांदवत नाही, म्हणून मुलीकडच्या मंडळींनी जावयाला सासरी बोलावून घेतले. त्याचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत गुप्तांगात कारल्याच्या सहाय्याने मिरची भरण्याचा प्रयत्न करीत त्याचा अमानूष छळ केला. हा प्रकार ४ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बोराखेडी गावात घडल्यानंतर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपली बदनामी होत असल्याने जावयाने उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील मावस बहिणीच्या गावी शुक्रवारी (१६ जुलै) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
संबंधित घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्याला सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिवाजी रघुनाथ चव्हाण (२२, रा. कबालवाडी, ता. जुन्नर, जि.पुणे) असे छळ झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी चव्हाण याच्या आईच्या फिर्यादीवरून या घटनेची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
-----
७ जुलैला बोराखेडी ठाण्यात गुन्हा दाखल
जावयाला केलेल्या मारहाणप्रकरणी बोराखेडी (जि. बुलडाणा) पोलिसांनी ७ जुलै रोजी सासरकडील अकरा जणांवर गुन्हा दाखल केला. यात जिजाबाई पवार (सासू), रामराव पवार (सासरा), विजय पवार (मेव्हणा), रवी पवार, राजू पवार, विकास पवार (चुलत मेव्हणे), देवानंद मोहिते, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेखाबाई, काळूबाई पवार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी चार जणांना अटक केली असून, सात जण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती बोराखेडी पोलीस ठाण्याचे पोउपनि. अशोक रोकडे यांनी दिली.
--
जीवे मारण्याची धमकी
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर नातेवाईकांनी शिवाजी चव्हाणला सिल्लोडच्या खासगी रुग्णालयात उपचार देऊन जुन्नर (जि. पुणे) येथे पाठविले. सासरकडील मंडळींनी व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे आपली बदनामी झाली. त्यामुळेच माझ्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या सासरकडील लोकांकडून मला व माझ्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार शिवाजीची आई सैजलाबाई चव्हाण यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिली.
---
चौकशी करून दोषींवर कारवाई करू
संबंधित घटना बुलडाणा जिल्ह्यातील असून तेथे आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आमच्याकडे याप्रकरणी आता अर्ज आला. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
- गिरीधर ठाकूर, सपोनि. अजिंठा ठाणे.