बीड : काटकसर करायची तरी किती? पोटमारा करुन कुढत जगायचं कसं? असा प्रश्न जिल्ह्यातील गृृहिणींना पडला आहे. सततची भाववाढ व वाढत्या गरजा याचा मेळ घालताना महिला अक्षरश: मेटाकुटीला आल्या आहेत. किराणा सामान, भाजीपाला व फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. कांदे वगळता सध्या काहीच स्वस्त नाही. किचन बजेट कोलमडून पडल्याने सामान्यांच्या जगण्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.मागील सहा महिन्यांत किराणा सामानाच्या दरात होणाऱ्या वाढीला ‘ब्रेक’ तर बसलेलाच नाही; परंतु त्यात दिवसागणिक भर पडू लागली आहे. काही वस्तुंचे भाव तर दुप्पट झाले आहेत. उन्हाळयात कांद्याने सत्तरीचा दर पार केला होता. त्यामुळे ‘आम आदमी’च्या डोळ्यात पाणी आले होते. आता कांद्याचे दर १० रुपये किलोपर्यंत गडगडले आहेत. कांद्याला स्वस्ताई आली असली तरी मिरची, लसूण, टोमॅटो, बटाटे, कोबी, वांगे, लिंबू यांचे दर मात्र वाढतच आहेत. यंदा आतापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मात्र, काही पिके अद्याप बाजारात आली नाहीत. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढलेले असल्याचे विके्रते सत्तार शेख यांनी सांगितले.किराणा सामानाची दरवाढ तर चक्रावून सोडणारी आहे. महागाईने गोरगरिबांच्या घरी डाळ शिजणे अवघड होऊन बसले आहे. मसाला पदार्थांचे भाव स्थिर आहेत; परंतु फोडणीसाठी लागणाऱ्या तेलाच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशावर बोजा पडला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्रिकोणी कुटुंबाचा महिन्याचा किराणा माल साधारण दोन हजार रुपयांत येत होता. आता त्यासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. किराणा बजेटमध्येही आता जास्तीची तरतूद करण्याची वेळ आली आहे. उत्पन्न व खर्च याचे गणित जुळविताना चाकरमान्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरिबांची दमछाक चित्र आहे. (प्रतिनिधी)
स्वस्त फक्त कांदे, बाकी वांधे !
By admin | Updated: August 18, 2016 00:58 IST