लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तुटलेल्या विद्युत तारेला हात लागल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बीड तालुक्यातील नाळवंडी भागात मंगळवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये नवविवाहितेसह चिमुकल्याचा समावेश आहे.सत्यम नारायण काळे (वय ३), मीरा मनोज यादव (२०) अशी विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नाळवंडी गावाजवळच मौज तलाव आहे. या तलावाच्या बाजूलाच सखाराम काळे हे राहतात. काळे यांची मुलगी मीराचा वडवणी तालुक्यातील धुनकवड येथील मनोज यादव या तरुणाशी १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. मनोज हा औरंगाबादला असतो. लग्नानंतर मीरा ही माहेरी वडिलांकडे आली होती. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मीरा ही सत्यमला अंगणात खेळवत होती. याचवेळी तिचा हात घरात असणाऱ्या वायरला लागला. यामध्ये तिला विजेचा जोराचा धक्का बसला. तिच्या बाजूलाच सत्यम असल्याने त्यालाही शॉक लागला. काही समजण्याच्या आतच दोघेही गतप्राण झाले. घटनेची माहिती समजताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या घटनेने नाळवंडी गावावर शोककळा पसरली आहे.
नवविवाहितेसह चिमुकल्याचा विद्युत तारेला चिकटून मृत्यू
By admin | Updated: June 14, 2017 00:28 IST