किनवट : बोगस जात प्रमाणपत्र हस्तगत करून आदिवासी होवू पाहणाऱ्यांनो, तुम्हाला खेकडा, घोरपड, ससा तरी धरता येतो का? बोगस नाहीत तर चौकशीला का घाबरता? असा प्रश्न आ़ डॉ़ संतोष टारपे यांनी येथील सभेत उपस्थित केला़ राज्यभरातून लाखाच्या जवळपास मोर्चेकरी सहभागी झाले होते. राज्यात जातचोरीचे प्रमाण वाढले आहे़ या चोरांनी मूळ आदिवासींची जमीन चोरली़ जल चोरले, जंगल चोरले, जातही चोरली़, असा आरोप राळेगावचे आ़ प्रा़ डॉ़ अशोक उईके यांनी करत जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र बनावट दस्तावेज सादर करून प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात करणार असल्याचे आ़ उईके म्हणाले़ पाच हजारांची चोरी करणारा चोर मग जात चोरणाऱ्यालाही चोर ठरवले पाहिजे़ आमच्या ताटातला घास हिसकावून खाऊ नका, जात चोरीचा प्रयत्न थांबवा, बोगस जातीच्यांना संरक्षण देणारे २१ आॅक्टोबर २०१५ चे परिपत्रक रद्द करावे, राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करावी यासाठी सर्व आदिवासी आमदार ९ मार्चच्या अधिवेशनात एकमुखी मागणी करणार आहोत़ योजना देऊ नका, पण बोगसगिरी थांबवा, अशी मागणी करणार असल्याचे आदिवासी आमदारांचे राज्याध्यक्ष, आर्णीचे आ़राजूभाऊ तोडसाम यांनी जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले़ अधिकारप्रती महाविराट मोर्चाचे आयोजक संयोजक माजी आ़भीमराव केराम यांनी एकाच आईच्या कुशीतून जन्माला आलेला एक भाऊ बेलदार, दुसरा मन्नेरवार व तिसरा मन्नेरवारलू कसा असू शकतो, असा प्रश्न केला़ प्रास्ताविक प्रा़ विजय खुपसे यांनी केले़ सूत्रसंचालन गोपीनाथ बुलबुले यांनी केले़ नारायणराव सिडाम, जनाबाई डुडुळे, दत्तराम गेडाम, बंडूजी राजगडकर, बाबाराव मडावी, प्रा़ हमराज उईके, सतीश पाचपुते, रामदास किनाके, प्रा़ किसन मिराशे, माधव किरवले, नीळकंठ कातले, विकास कुडमेथे, जयवंत वानोळे, काळे, गोविंद अंकुरवार, संजय सिडाम आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
बोगस नाहीत तर चौकशीला सामोरे जा - संतोष टारपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 23:26 IST