लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे. देशभक्त म्हटले की, त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जातो. मात्र, प्रेम असा शब्द आहे की, त्यात सर्व काही समान असते. त्यामुळे मी देशभक्त नव्हे, तर देशप्रेमी असल्याचे ‘जेएनयू’ विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी मुक्तसंवादात स्पष्ट केले.कन्हैयाकुमार लिखित ‘बिहार से तिहार’ या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन तापडिया नाट्यगृहात कन्हैयाकुमार यांच्या हस्ते पार पडले. तेव्हा त्यांनी उपस्थित श्रोत्यांशी मुक्तसंवाद साधला. मागील तीन वर्षांपासून देशभरातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांना केंद्र सरकारने टार्गेट केले आहे. शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्यास गरीब, दलित, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिकणार नाहीत. या षडयंत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींमध्ये कपात, बंद करण्यापासून झाली. या विरोधात पहिल्यांदा हैदराबाद विद्यापीठात आवाज उठवला. यासाठी विद्यापीठात कार्यरत आंबेडकरवादी विद्यार्थी चळवळ संघटनेचा नेता रोहित वेमुला याला जबाबदार धरले. यातून त्याचा मानसिक छळ सुरू केला. हा छळ रोहितला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यापर्यंत गेला. त्यामुळे ती आत्महत्या नव्हे तर या व्यवस्थेने केलेली नियोजित हत्याच असल्याचे कन्हैयाकुमार यांनी सांगितले. यानंतर जेएनयू विद्यापीठाकडे लक्ष वळविण्यात आले. त्याठिकाणच्या विचारांना संपविण्यासाठी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा फेक व्हिडिओ समोर आणला. त्यातून आम्हाला देशद्रोही ठरवले. मात्र आता त्या घटनेला १६ महिने झाले तरी अद्याप आरोपपत्र दाखल करू शकले नाहीत. यातून संघाला केवळ देशात मनुवाद आणायचा आहे. यासाठीच शिक्षण संस्थांवर सुनियोजित हल्ले सुरू केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. भालचंद्र कांगो यांनी अध्यक्षीय समारोप केला. पुस्तकाच्या अनुवादावर कवी डॉ. गणेश विसपुते यांनी भाष्य केले. पुस्तकाच्या अनुवादामागची भूमिका अनुवादक डॉ. सुधाकर शेंडगे यांनी मांडली. डॉ. कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार रामप्रसाद वाहूळ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता क्रांतिगीत आणि राष्ट्रगीताने झाली.
मी देश‘भक्त’ नव्हे, तर देशप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:48 IST