पाटोदा : शैक्षणिक वर्षाला सुरवात होऊन सहा महिने उलटले तरी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश आॅनलाईन प्रक्रियेच्या पुर्णत्वानंतरच दिला जाणार असल्याचा डांगोरा पिटण्यात आला मात्र आॅनलाईन सेवा प्रक्रियेत बिघाड झाल्यानेवसतिगृहातील प्रवेश सेवा ही ‘आॅफलाईन’ झाली असल्याचे दिसते.जिल्ह्यात पाटोदा येथेच मुलींची एकमेव निवासी शाळा असल्याने विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुला - मुलींकरिता दोन स्वतंत्र वसतीगृह उभारली आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून अद्यापर्यंत विद्यार्थ्यांना आॅन प्रवेश प्रक्रियेत बिघाड झाल्याने वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही. विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील प्रवेशाकरिता शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच ‘आॅन लाईन’अर्ज सामाजिक न्याय विभागाकडे सुपूर्द केले होते मात्र अद्यापपर्यंत आॅन लाईन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. अद्यापर्यंत केवळ १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असून २२०० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होणे बाकी आहें. आॅन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करून विद्यार्थ्यांना वसतीगृहात त्वरीत प्रवेश देण्याची मागणी विद्यार्थी व सामाजिक संघटनेतून होत आहे.(वार्ताहर)
वसतिगृहातील प्रवेश झाले ‘आफ लाईन’
By admin | Updated: September 23, 2014 01:36 IST