चंद्रमुनी बलखंडे, आ.बाळापूरराज्य शासनाने नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा निर्मिती केल्याने आता आखाडा बाळापूरकरांच्याही आशा पल्लवीत झाल्या असून, कळमनुरी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कळमनुरी तालुक्याचे विभाजन करून नवीन आखाडा बाळापूर तालुका निर्माण करावा, ही आखाडा बाळापूरकरांची १९८१ पासूनची मागणी आहे. बॅ. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी नवीन तालुका निर्मिती करत असताना बाळापूरचाही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होेते. त्यानंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आखाडा बाळापूरकरांना आश्वासने दिली. युती शासनाच्या काळात सेनगाव, औंढा तालुका निर्मिती झाली; परंतु आखाडा बाळापूरचा विषय मागेच राहिला. तालुका निर्मिती करत असताना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा, गावाची संख्याही मोठी आहे. ३० वर्षांपासूनची मागणी नेतृत्वाअभावी तशीच राहिली आहे; परंतु मागील वर्षी विद्यमान खा. राजीव सातव यांच्या जाहीर सभेच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कळमनुरी येथे आखाडा बाळापूर तालुका निर्मितीची आशा पल्लवीत केली व जेव्हा केव्हा नवीन तालुका निर्मिती होईल, तेव्हा आखाडा बाळापूर अग्रस्थानी असेल, असे आश्वासन दिले होते. योगायोग म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात काल नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने आता आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या मागणीचा जोर वाढू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत, पंचवीस हजारांच्या वर लोकसंख्या, मुख्य बाजारपेठ, शिवाय नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील २५ ते ३० गावांचा नित्याचा संपर्क बाळापुरशीच असतो. त्या गावांचीही मागणी बाळापूर तालुका निर्मितीची आहे. तालुका निर्माण झाल्यास त्यात समाविष्ट होण्याची त्यांची तयारीही आहे. कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखा असलेले महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंग, दालमिल, पोस्ट आॅफिस, राष्ट्रीयीकृत चार बँकांसह ७ ते ८ बँका, खा. राजीव सातव यांच्या प्रयत्नातून येथे ग्रामीण रूग्णालय झालेले आहे. मुख्य म्हणजे, सशस्त्र सीमा बलाचे युनिटही हाकेच्या अंतरावर उभारले जात आहे. जवळच बोल्डा रेल्वेस्टेशन आहे. त्यामुळे तालुका निर्माण होण्यासाठी लागणारी सर्वच कार्यालये बाळापुरात आहेत. तालुका निर्माण झाल्यास पाटबंधारे विभागाची रिकामे कार्यालये, प्रशस्त जागाही आहे. परिसरातील गावांसाठी आखाडा बाळापूर मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे जनतेचा पैसा व वेळेचीही बचत होणार आहे. आता ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा निर्मिती करण्यात आल्याने आखाडा बाळापूर तालुका निर्मितीचा जोर वाढला आहे. खा. राजीव सातव राष्ट्रीयस्तरावर कार्य करत असल्याने त्यांचा शब्द मुख्यमंत्री खाली जावू देणार नाहीत, हे जनतेला माहीत असल्याने त्यांच्याकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.
आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या आशा पल्लवीत
By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST