लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चुकून सहप्रवाशाची नेलेली दोन लाख रुपयांची बॅग एका प्रामाणिक प्रवाशाने मध्यवर्ती बसस्थानकातील कंट्रोलरलकडे परत केली. कंट्रोलरने ही बॅग संबंधित बसचालक आणि वाहकाकडे दिली. या बॅगसह बस पुण्याच्या प्रवासासाठी गेल्याची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांनी धावपळ करून दीड तासात नेवासा फाट्याजवळ तेथील पोलिसांच्या मदतीने बस थांबवून दोन लाख रुपयांच्या रकमेसह बॅग ताब्यात घेऊन ती बॅगमालकास परत केली. प्रीतेश लखणीचंद अग्रवाल (रा. शिरपूर, ता. धुळे) हे जालना येथून औरंगाबादमार्गे शिरपूरला जाण्यासाठी खामगाव-पुणे या बसमध्ये प्रवास करीत होते. क्रांतीचौकात या बसमधील चार ते पाच प्रवासी उतरले. बस अदालत रोडपर्यंत गेल्यानंतर त्यांची बॅग गायब झाल्याचे प्रीतेश यांच्या लक्षात आले. क्रांती चौकात उतरलेल्या प्रवाशांनी बॅग गायब केल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार दिली.सहायक निरीक्षक श्यामकांत पाटील, डी.बी.चे पोलीस कर्मचारी, उपनिरीक्षक चव्हाण हे क्रांतीचौक आणि नंतर बसस्थानकात गेले. तेथील वाहतूक निरीक्षक यांना भेटून खामगाव-पुणे या बसविषयी चौकशी करू लागले. तेव्हा तासाभरापूर्वी एका व्यक्तीने चुकून दुसऱ्या प्रवाशाची बॅग तो घेऊन गेल्याचे सांगून बॅग वाहतूक नियंत्रण कक्षाकडे जमा करून तो निघून गेल्याचे सांगितले. नंतर ही बॅग खामगाव-पुणे बसच्या वाहकांकडे सुपूर्द केल्याचे वाहतूक निरीक्षकांनी पोलिसांना सांगितले. ही बस पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रामाणिक प्रवाशाने दोन लाखांची बॅग केली परत
By admin | Updated: June 10, 2017 00:15 IST