नांदेड :यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलमध्ये ४३ अंशावर पारा गेला होता़ त्यानंतर मात्र एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठी घट झाली होती़, परंतु आता मे अखेरीस पुन्हा एकदा तापमान वाढले असून शनिवारी पारा ४४़५ या उच्चांकावर पोहोचला होता़ त्यामुळे नांदेडकरांच्या अंगाची लाहीलाही झाली़ यंदा फेब्रुवारीपासूनच नांदेडकरांना उन्हाचे चटके बसू लागले होते़ परंतु एप्रिलमध्ये अचानक उन्हाचा पारा वाढतच गेला़ १७ एप्रिल रोजी तर ४३़३ एवढी तापमानाची नोंद झाली होती़ त्यानंतर मात्र तापमानात थोड्या प्रमाणात घट झाली़ पुन्हा २८ एप्रिल आणि १ मे रोजी तापमान ४३ अशांवर पोहोचले होते़ मे च्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात मात्र ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे तापमानात घट होवून नांदेडकरांना दिलासा मिळाला होता़ त्यात आता मे अखेरमध्ये मान्सून अंदमानात दाखल झालेला असताना पुन्हा एकदा तापमान वाढले आहे़ २३ मे रोजी ४३़३ अंशावर असलेले तापमान शनिवारी मात्र पुन्हा वाढून ४४़५ अंशावर पोहोचले होते़ यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाची ही सर्वाधिक नोंद ठरली़ त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट होता़ महत्वाच्या कामाव्यतिरिक्त नांदेडकरांनी घराबाहेर पडणेही टाळले होते़ अनेकांनी आपली प्रतिष्ठानेही उन्हाच्या चटक्यामुळे बंद ठेवली होती़ बाजारपेठेतही दुपारच्या वेळी ग्राहकांची संख्या रोडावली होती़ रुमाल, छत्री याचबरोबर उन्हापासून बचाव करण्यासाठी नांदेडकरांची कसरत सुरु होती़ सायंकाळच्या वेळी मात्र तापमानात थोडी घट झाली होती़ त्यामुळे नागरिकांची रस्त्यावर गर्दी दिसत होती़ परंतु वाढलेल्या तापमानाची धग रात्रीपर्यंत कायम राहत असल्यामुळे नांदेडकर घामाघूम होत आहेत़ त्यात अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे त्यांच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे़ (प्रतिनिधी)
नांदेडात उच्चांकी तापमान
By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST