परभणी : येथील जिल्हा परिषदेत परिचर पदाच्या लेखी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. परभणी जिल्हा परिषदेत परिचर पदाच्या १९ रिक्त जागांसाठी १९ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचे संच सीलबंद नसल्याने पेपर फुटल्याच्या प्रकरणावरुन गोंधळ उडाला होता. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. या संदर्भातील लक्षवेधी जिंतूरचे आ.विजय भांबळे, गंगाखेडचे आ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केली. ते म्हणाले की, काही केंद्रावर उमेदवारांना अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. तर काही ठिकाणी १० ते १५ मिनिटे उशिराने प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच व्हॉटस्अॅपवर या प्रश्नपत्रिका आल्या. तसेच भरती प्रक्रियेदरम्यान दलालांनी १० ते १५ लाख रुपये घेतले. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या लक्षवेधीवर उत्तर देताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जाईल. तसेच दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल. माजीमंत्री जयंत पाटील यांनी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जि. प. चे प्रमुख या नात्याने सर्वस्वी जबाबदार असून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी
By admin | Updated: December 18, 2015 23:31 IST