सोयगाव : निवडणूक विभागाकडून अनुक्रमांक मिळताच सोयगाव तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी तालुकाभर ढगाळ वातावरण होते. या वातावरणातही गावागावातील राजकीय जुगलबंदी रंगली आहे. गाव पुढाऱ्यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली असून केंद्र व राज्यशासनाच्या योजनांचा हायटेक मुद्दा प्रचारात घेतला आहे.
सोयगाव तालुक्यात ३६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. कोरोना संसर्गामुळे गाव विकास ठप्प झाला होता. त्यामुळे मतदारांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी रणनिती आखलेली दिसून येत आहे. आमचे पॅनलच कसे योग्य आहे. आम्हालाच संधी द्या अशी आर्त हाक उमेदवार मतदारांना करीत आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ग्रामीण भागात घरकूल हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा झालेला आहे. तर कृषी विधेयकावरून देखील गावातील लोकांमध्ये प्रचार केला जात आहे. मुळात गावासाठी काय करणार हा प्रचाराचा मुद्दा न करता राज्य आणि केंद्रशासनाच्या योजनांबद्दल माहिती देऊन प्रचार केला जात आहे. यात भाजपप्रणित पॅनलचे उमेदवार केंद्राची बाजू घेऊन प्रचार करतात. तर शिवसेना प्रणित पॅनल हे राज्य सरकारची बाजू घेऊन प्रचार करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात हायटेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे.